नाशिक - नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नाशिकच्या पोलीस आयुक्तालयात कार्यान्वित करण्यात आलेले कोविड सेंटर पुन्हा एकदा सर्वांसाठी आदर्श ठरत आहे. या ठिकाणी प्राचीन जलनेती आणि सूर्यस्नान करून तब्बल 90 बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
एकाही बाधिताला ऑक्सिजनची गरज पडली नाही
आयुर्वेदिक उपचार पद्धती, या कोरोना बाधितांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवून त्यांना लवकर बरे करण्यासाठी अधिक प्रभावी असल्याचं आयुष विभागाने स्पष्ट केले आहे. या उपचार पद्धती दैनंदिन जीवनात अवलंब केल्यास कोरोनाचा धोका कमी होतो. पोलीस आयुक्तालयात सुरु करण्यात आलेल्या पोलीस कोविड केअर सेंटर मध्ये तब्बल 90 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली या कोविड सेंटरमध्ये जलनेती आणि सूर्यस्नान या क्रिया कोरोना बाधितांकडून करून घेतल्या जात आहे. यामुळे याठिकाणी उपचार घेत असलेल्या 90पैकी एकाही कोरोना बाधिताला ऑक्सिजनची गरज पडली नाही. त्यामुळे सर्वांनीच या उपचार पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक कुमार पाण्डेय यांनी केले आहे.
'सूर्यस्नान केल्यामुळे शरीराला आवश्यक विटामिन्स मिळतात'
या कोविड सेंटरमध्ये दररोज सकाळी कोवळ्या उन्हामध्ये बाधितांकडून सूर्यस्नान करून घेतले जाते. यामुळे शरीराला आवश्यक विटामिन्स मिळत असून रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच दिवसातून एक ते दोन वेळा जलनेती केल्यास श्वास मोकळा होऊन विषाणू नाकाद्वारे बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे सर्वांनी प्राचीन रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या उपचार पद्धती दैनंदिन जीवनात आमलात आणाव्या, असे आवाहन पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी केले आहे. पोलीस आयुक्तांचा हा पॅटर्न पोलिसांसाठी लाभदायक ठरत आहे. कोरोनावर यशस्वीपणे मात करण्यासाठी सर्वांनी या उपचार पद्धतींचा अवलंब करण्याची गरज निर्माण झाली आहे.
हेही वाचा - राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण, लीलावती रुग्णालयात दाखल