नाशिक - शहरात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारे 850 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी यूटीएसटी ग्लोबल कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर स्मार्ट सिटीकडून कंपनीला 55 कोटींचा निधी दिला जाणार आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुरक्षितेसाठी वाहतूक नियोजन, अपघातातील वाहनांच्या शोधासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची तरतूद आहे. या अंतर्गत नाशिक महानगरपालिकेची स्मार्ट सिटी अंतर्गत निवड झाल्याने या ठिकाणी शहरात आयटीसी प्रकल्प राबवण्यात येत आहे. या अंतर्गत प्रमुख 40 चौकांसह 850 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. सोबतच सिग्नलवर अत्याधुनिक कॅमेरे लावण्यासह वाय-फाय स्पॉट उभारले जाणार आहेत.
वादावर पडदा - या कामासाठी महाआयटी विभागाने हे कंत्राट यूटीएसटी ग्लोबल या कंपनीला दिले. हा प्रकल्प दीड वर्षापासून स्मार्ट सिटी कंपनी आणि ग्लोबल कंपनीतल्या वादामुळे रखडला होता. स्मार्ट सिटी कंपनी महाआयटीला 100 कोटींचा निधी देणार आहे. यापैकी 45 कोटींचा स्मार्ट सिटी कंपनीने आधीच महाआयटीकडे वर्ग केला आहे. परंतु ग्लोबलने काम सुरू न करता उर्वरित निधीची ही मागणी केली होती. त्याला संचालक मंडळाने तीव्र विरोध केला होता.
वादावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत बैठक - महाआयटी सीसीटीव्ही आणि आयटीसी एकत्रित निधी देण्याऐवजी टप्प्याटप्प्याने कामानुसार निधी देण्याची भूमिका संचालकांनी घेतली होती. त्यावरून वाद सुरू आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव असीमकुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत महाआयटी, ग्लोबल कंपनी आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ सुमंत मोरे उपस्थित होते. या बैठकीत ग्लोबल कंपनीने आठवड्याभरात सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू करण्याचेही आदेश गुप्ता यांनी दिले आहेत.