नाशिक - नाशिक शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन ( Smart City Corporation Company ) अंतर्गत गाजावाजा करून पीपीपी तत्त्वावर सुरू केलेला पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्प डब्यात गेलाय, या प्रकल्पात 20 कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन कंपनीने हिरो युऑन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी पब्लिक बाइसिकल शेअरिंग प्रकल्पाचे पीपीटी तत्त्वावर काम दिले होते. यानंतर 10 ऑक्टोबर 2018 पासून नाशिक शहरात सायकल प्रकल्प सुरू ( Smart Cycle Project ) करण्यात आला. नागरिकांचा चांगला प्रतिसाद वाढल्यानंतर शंभर डॉकिंग स्टेशन व एक हजार सायकल शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र, कालांतराने नागरिकांचा प्रतिसाद कमी होत गेला. अशात हिरो युऑन कंपनीनेही या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले. अशा सायकल नादुरुस्त होणे, चोरीला जाणे असे प्रकार वाढले, या बाबी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीला वारंवार निदर्शनास आणून दिल्या. मात्र कंपनीने सातत्याने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर होरो युऑन सोबतचा करार रद्द झाला आणि हा प्रकल्प गुंडाळला गेला.
घोटाळ्याचा संशय - नाशिक म्युन्सिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या इतिवृत्तात पब्लिक बायसिकल शेअरिंगसाठी 28.23 कोटी रुपये खर्च झाल्याचे नमूद आहे. मात्र, कंपनीकडून या संदर्भात काढण्यात आलेल्या निविदांमध्ये अंदाजे प्रकल्प किंमत नमुद करणे. पब्लिक बाइसिकल शेअरिंग प्रकल्पाच्या हिशोब न ठेवणे. जमाखर्च माहिती नसणे असे प्रकारचे गंभीर प्रकार दिसून आलेत. वास्तविक कोणत्याही कामाच्या निविदामध्ये नमूद नियम नियमावलीप्रमाणे याची प्रत्यक्ष खबरदारी ही स्मार्ट सिटी कंपनीची आहे, असे असताना ही जबाबदारी स्मार्ट सिटी कडून पार पाडण्यात आली नाही.
हेही वाचा - Sanjay Raut : 'त्या' १२ खासदारांना अपात्र ठरवा.. संजय राऊतांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मागणी
2 लाखाला एक सायकल - पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्पसाठी 28 कोटी पैकी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आठ कोटी रुपये खर्च जरी गृहीत धरला तरी, 1 हजार सायकलीसाठी 20 कोटी रुपये खर्च झाले का? अर्थात 2 लाखाला एक सायकल विकत घेतली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकल्पात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा संशय असून याबाबत सामाजिक कार्यकर्ते देवाग जानी यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहिती वरून उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी केली आहे.
स्मार्ट सिटी म्हणते माहिती उपलब्ध नाही - नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशने एकूण 1 हजार सायकलीसाठी झालेला खर्चाची रक्कम तसेच एक सायकल साठी किती रुपये खर्च झाले याची माहिती उपलब्ध नाही असे सांगितले आहे. ऑपरेशन व मेंटेनेससाठी दिलेली रक्कम व शिल्लक रक्कम रुपयाची माहिती देखील विभागाकडे उपलब्ध नाही. स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनकडून अशाप्रकारे उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याने या प्रकल्पामध्ये घोटाळा झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
हेही वाचा - Sushma Andhare joins Shiv Sena : सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश; उपनेतेपदी नियुक्ती
541 सायकल सापडल्या - पब्लिक बाइसिकल शेअरिंग प्रकल्प गुंडाळला गेल्यानंतर, स्मार्ट सिटीने बेवारस पडलेल्या सायकली गोळ्या केल्या. यात 1 हजार पैकी अवघ्या 541 सायकली सापडल्यात उर्वरित सायकली गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सुरुवातीला एक वर्ष हा प्रकल्प चांगला चालला नंतर हळूहळू सायकलच्या चोऱ्या वाढू लागल्या. भुरट्या चोरट्याने सायकलचे सीट आणि चाके देखील चोरण्यास सुरुवात केली. त्यामुळे कंपनी तोट्यात जाऊ लागली आणि तिने यातून अंग काढला आणि हा प्रकल्प गुंडाळला.
सायकली आदिवासी पाड्यावर द्या - मागील पाच वर्षात नाशिक मध्ये सायकलची मोठी चळवळ उभी राहिली आहे,आज दोन ते तीन हजार नियमित सायकल चालवणारे आहेत.अशाच स्मार्ट सिटी अंतर्गत पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्प चांगला होता,लोकांना सायकल चालवण्याची सवय लागत होती, मात्र हा प्रकल्प योग्य पध्दतीने राबवता आला नाही,त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे,या प्रकल्पातील सुस्थितीत असलेल्या सायकली आदिवासी पाड्यावर द्या अशी मागणी सायकलिस्ट डॉ. मनीषा रौंदळ यांनी केली आहे.