नाशिक - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आतापर्यंत 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून कोरोना बाधित पोलिसांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी नाशिकमध्ये पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी शंभर खाटांचे कोविड सेंटर उभारणार असल्याची माहिती नवनियुक्त पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक शहारत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून आतापर्यंत 30 हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून यात 526 जणांचा बळी गेला आहे. यात 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. शंभरहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनासाठी नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा आरोग्य प्रशासन चांगले काम करत असले तरी दुसरीकडे मात्र व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने रुग्णांना रुग्णालयांच्या दारोदार फिरावे लागत आहे.अशात कोरोना योद्धे म्हणून गेल्या पाच महिन्यांपासून नागरिकांच्या सुरक्षितेसाठी आपले कर्तव्य बजावणाऱ्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासाठी नाशिकमध्ये लवकरच शंभर खाटांचे कोविड सेंटर उभारणार असून त्या सेंटरमध्ये पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि त्यांच्या कुटुंबियांना उपचार घेता येणार असल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले. नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयात 3 हजार 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असून या कोविड सेंटरचा सर्वांना फायदा होणार आहे. तसेच पोलिसांसाठी दोन स्वतंत्र रुग्णवाहिका देखील तैनात राहणार असल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले.
हेही वाचा - तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून मनसेचे बिटको रुग्णालयासमोर आंदोलन