नागपूर - शहरावर ओढवलेलं पाण्याचे संकट पुढील काही महिने कायम राहणार असल्याचे संकेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. पाणी कपात करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगताना त्यांनी यावर राजकारण करू पाहणाऱ्यांचा समाचार घेतला. हे संकट कृत्रिम नसून नैसर्गिक असल्याचे देखील बावनकुळे म्हणाले आहेत.
पावसाचे आगमन लांबल्याने 15 दिवसांपूर्वी नागपूर महापालिकेने एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला केवळ आठवडाभरासाठी घेण्यात आलेला तो निर्णय पुढे महिनाभरासाठी लागू करण्यात आला होता.
सोमवारी या विषयावर नागपूर शहराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली. नागपूर शहराला पुढेही पाणी मिळावे या करिता पाणी कपात करण्यावाचून कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे. पाणी कपात लागू होताच आंदोलनाचे सत्र सुरू झाले आहे.
भविष्याची गरज लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉटर टनेल बनवण्याचं काम हाती घेतले आहे. शिवाय कन्हान नदी ही तोतलडोह धरणात सोडण्यासंदर्भात काम सुरू असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.