नागपूर - विधानपरिषद पदवीधर निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नागपुरातील १६४ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी मतदार सकाळपासूनच मतदान करण्यासाठी केंद्रावर दाखल होत असल्याचे पहायला मिळत आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर देखील प्रशासनाकडून खबरदारी म्हणून सर्वच व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले.
सर्वांचे लक्ष लागलेल्या विधानपरिषद पदवीधर निवडणूक मतदान प्रक्रियेला आज सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया चालणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने संसर्ग होऊ नये म्हणून मतदान केंद्रावर सर्वच खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात आल्याचे पहायला मिळत आहे. यात मतदानासाठी आलेल्या मतदारांचे थर्मल स्क्रिनिंग केल्या जात आहे. तसेच सॅनिटायझेशनची व्यवस्थाही प्रत्येक केंद्रावर करण्यात आली आहे. नागपुरात १ लाख २ हजार ८०९ मतदार आहेत. त्यामुळे नागपूरच्या मतदानाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मतदान प्रक्रियेला सुरूवात होताच मतदारांकडून मतदान करण्यासाठी केंद्रावर दाखल होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे एकंदरीतच ही पदवीधर निवडणूक सर्वच अंगाने महत्वपूर्ण आहे. म्हणूनच प्रशासन व विविध राजकीय पक्षांच्यावतीने मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केले मतदान -
नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी सकाळी गणेशपेठ येथील स्व. साखरे गुरुजी उच्च प्राथमिक शाळेत जाऊन मतदान केले. त्यांना दिल्लीला जायचे असल्याने त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. याआधी शिक्षक आमदार ना गो गाणार यांनी देखील मतदान केले आहे.
या निवडणुकीत भाजपविरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होत असली तरी इतर पक्षाचे उमेदवार आणि अपक्षांनी देखील प्रस्थापितांना धडकी भरवली आहे. भाजपचे उमेदवार संदीप जोशी आणि काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांच्यात थेट लढत होताना बघायला मिळत आहे. सलग तीनवेळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. याच मतदारसंघातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वडील दिवंगत गंगाधरराव फडणवीस, पंडित बच्छराज व्यास यांनी देखील प्रतिनिधित्व केलेले आहे. गेल्या ५८ या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवाराच जिंकलेले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.