नागपूर - कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही पाच डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे सर्व डॉक्टर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कार्यरत आहेत.
पहिल्या टप्यात कोरोनाच्या लढ्यात आघाडीवर असलेल्या डॉक्टरांनी कोरोना प्रतिबंधक लस लावून घेतली होती. तरीदेखील त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उपराजधानी नागपूरात असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे दिसत आहे. मेडिकल आणि डेंटल रुग्णालयातील मिळून ३८ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी पाच डॉक्टरांना पहिल्या टप्यातील कोरोना प्रतिबंधक लस लावली होती, अशी माहिती गुरुवारी पुढे आली आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेज कोरोनाच्या विळख्यात अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. यामध्ये निवासी डॉक्टरसहित इतर संक्रमित झाल्याची माहिती पुढे आली आहे.
मेडिकलवर ताण येण्याची शक्यता-
मेडिकलमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मेडिकल प्रशासनाने संपूर्ण हॉस्टेलचे निर्जुंतुकीकरण करण्यात आले आहे. तर ऑफलाइन क्लास बंद करून ऑनलाइन क्लास सुरू करण्यात आले आहेत. प्रात्याक्षिकसुद्धा बंद करण्यात आलेले आहेत. कोविडच्या काळात विदर्भातील एकमेव कोविड रुग्णालय म्हणून मेडिकल काम करत होते. त्यामुळे पुन्हा एकदा नागपूरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. डॉक्टरच पॉझिटिव्ह होत असल्याने भविष्यात आरोग्य यंत्रणेवर ताण वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-'सर्व सरकारी अधिकाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याची सक्ती हवी'
दरम्यान, देशात १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधात लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे.