नागपूर - शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना आता बेड्ससुद्धा मिळणे कठीण झाले आहेत. अशात आज तब्बल दोन वृद्ध कोरोनाबाधित रुग्णांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या पैकी ८१ वर्षीय रुग्णाने तर कोविड वॉर्डाच्या बाथरूममध्ये सलाइनच्या पाइपने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, तर दुसऱ्या घटनेत ६८ वर्षीय वृद्धाने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असून आत्महत्या करणारे दोन्ही रुग्ण हे २६ मार्च रोजीच कोरोनाबाधित झाले होते.
पहिली घटना
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये असलेल्या कोविड वॉर्डाच्या बाथरूममध्ये सलाइनच्या पाइपने एका रुग्णाने स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतल्याची सूचना डॉक्टरांना मिळाली होती. डॉक्टरांनी हॉस्पिटल स्टाफच्या मदतीने बाथरूमचे दार तोडले असता त्या ठिकाणी ८१ वर्षीय वृद्ध पुरुषोत्तम आप्पाजी गजभिये हे गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी सलाइनच्या पाइपच्या मदतीने गळफास लावला होता. या घटनेची माहिती समजताच अजनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे.
दुसरी घटना
ही अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच घडली आहे. ८५ प्लॉट परिसरात राहणारे ६८ वर्षीय वसंत कुटे यांनीसुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. २६ मार्च रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ते गृह विलगीकरणात होते. यादरम्यान त्यांना किडनी स्टोनचा त्रास वाढला होता. दोन दिवसांपासून हा त्रास असह्य होत असल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज मृतक कुंटे यांच्या कुटुंबीयांनी बांधला असल्याची माहिती, अजनी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय चौधरी यांनी दिली आहे.