नागपूर - दोन दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोरोनाची तिसरी लाट नागपुरच्या उंबरठ्यावर आली असल्याचे वक्तव्य केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास पुन्हा कडक निर्बंध लावणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. पालकमंत्री नितीन राऊत यांच्या वक्तव्यानंतर नागपुरच्या व्यापाऱ्यांनी पुन्हा लॉकडाऊन लावल्यास व्यापारी तीव्र विरोध करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भविष्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हेही वाचा - नागपूर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे कडक निर्बंध लागण्याचे संकेत
पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपुरात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे भाकित केले. मात्र, खरी परिस्थिती या उलट असल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. नागपूर शहरात केवळ ६० ते ७० रुग्ण सक्रिय असताना तिसरी लाट नागपूर शहराच्या वेशीवर आली असल्याचा दावा हा कोणत्या आधारे पालकमंत्र्यांनी केला? असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
- रुग्ण संख्या वाढल्यास नक्की सहकार्य करू:-
सध्या नागपुरात केवळ ६५ रुग्ण सक्रिय आहेत. त्यातही बहुतांश रुग्ण एका ठिकाणचे असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असे म्हणणे योग्य ठरणार नाही. मात्र, भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागला हे निदर्शनास येताच प्रशासनाकडून मिळणाऱ्या प्रत्येक सूचनांचे पालन करणार, मात्र परिस्थिती नियंत्रणात असताना विनाकारण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतल्यास त्याला तीव्र विरोधसुद्धा करू, अशी माहिती नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - राज्यात निर्बंध लावण्यासंदर्भातील चर्चा अद्याप नाही; मंत्री वडेट्टीवार यांचे स्पष्टीकरण