नागपूर - कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे नागपूर शहराची वाटचाल पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने होत असल्याचे बोलले जात आहे. शहरात लॉकडाऊन लागल्यास पुन्हा एकदा पोलीस यंत्रणेवर ताण येणार आहे. शहरात अशी परिस्थिती उद्भवल्यास त्याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती, शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. याचबरोबर त्यांनी नागरिकांकडून नियमांचे पालन होत असल्याचेदेखील सांगितले आहे.
परिस्थितीवर व्यक्त केले समाधान
आजपासून नागपूर शहरात दोन दिवसीय विकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने आज शहर पोलीस आयुक्तांनी संपूर्ण शहराचा आढावा घेतला. तेव्हा त्यांनी शहराच्या परिस्थितीवर समाधान व्यक्त केले आहे. आज व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवली असून सामन्य नागरिकांकडूनही सहकार्य मिळत असल्याचे म्हटले आहे.
'नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई'
गेल्या काही दिवसांपासून शहर पोलीस आणि महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाकडून सातत्याने बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरीदेखील कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाकडून कडक नियम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले जात आहे. तरीदेखील नागरिक नियम कायद्यांना जुमानत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.