नागपूर - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज नागपूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना केंद्रातून मदत मिळावी, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती करण्यात आली. नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत शेतकऱ्यांची व्यथा पोहचवावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. शहरातील संविधान चौकात हे आंदोलन झाले. विशेष म्हणजे, आंदोलक पणत्या, दिवाळीचा फराळ घेऊन गडकरी यांच्या घराकडे कूच करणार होते. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना काही वेळातच ताब्यात घेतले.
हेही वाचा - 'बिहारच्या निकालाचे सकारात्मक परिणाम होतील; राज्यातील सरकार चार वर्षही टिकणार नाही?'
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्या, सीसीआय कापूस खरेदी सुरू करा. शिवाय कृषी कायदा रद्द करा. यासह इतरही मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनांकडून हे आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत ही अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे केंद्रातूनही शेतकऱ्यांना मदत मिळावी. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गळ घालण्यासाठी हे आंदोलन त्यांच्या घरी जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. शिवाय गडकरी यांचे केंद्रात वजन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना त्यांनी पंतप्रधानांपर्यत पोहचवाव्या आणि शेतकऱ्यांना मदत करून दिवाळी गोड करावी. अशी भूमिकाही यावेळी आंदोलकांना मांडली. त्यामुळेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मिळणारी मदत कमी असल्याने दिवाळीचा फराळ व पणत्या घेऊन गडकरी यांच्या घरीच दिवाळी साजरी करू, असा पवित्राही यावेळी आंदोलकांनी घेतला.
पोलीस अटक करत असताना आंदोलकांनी सुरू केले 'राष्ट्रगीत'
काही वेळातच हे आंदोलन संविधान चौकातून गडकरी यांच्या घराकडे निघाले असतानाच पोलिसांनी आंदोलकांना रोखले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमधे झटापटही झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, यावेळी आंदोलकांनी शांततेचे पालन करत पोलीस अटक करताना राष्ट्रगीत सुरू केले. त्यामुळे पोलिसांनाही काही वेळ थांबावे लागले. मात्र, झटापटीनंतर अखेर पोलिसांनी या आंदोलकांना अटक केली. या आंदोलनात विविध जिल्ह्यातील स्वाभिमानीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी राज्य शासन व केंद्र शासन विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आले. मात्र, आंदोलकांना ताब्यात घेतांना पोलिसांचीही काही काळ चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा - मावळमधील 'या' युवा उद्योजिकेची लॉकडाऊनमध्येही कोटींच्या कोटी उड्डाणे..