मुंबई - कोरोनामुळे संपूर्ण सुट्या वाया गेल्याने काही विद्यार्थ्यांना पुन्हा शाळा सुरू कधी होते, असा प्रश्न पडला आहे. कोरोनामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेपासून मुक्ती मिळाली असली, तरी अनेक खासगी शाळांनी ऑनलाइन शिकवणीवर्ग सुरू केले आहेत. संचारबंदीत जिल्हा पातळीवर शिथिलता द्यायला सुरूवात झाली आहे. मात्र शाळांना इतक्यात सूट मिळेल, अशी शक्यता नाही. याविषयी ईटीव्ही भारतने घेतलेला खास आढावा....
कोरोनामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेता शाळा कधी सुरू होतील याचे उत्तर तुर्तास तरी कोणाकडे नाही. परंतु यानिमित्ताने आत्तापर्यंत धडे आणि पुस्तकांवर आधारित असलेल्या शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्याची एक नामी संधी सरकारला मिळाल्याचे मत सिस्कॉम संस्थेच्या संचालिका व शिक्षण सुधारणा प्रमुख वैशाली बाफना यांनी व्यक्त केले आहे.
इंग्लिश स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष अनिल दलाल म्हणतात, की आम्हाला वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती असलेले आणि त्याचे ज्ञान असलेले शिक्षक आता अधिकाधिक लागतील. ऑनलाईन शिक्षणाचा वापर शिकवण्यासाठी करता येईल, मात्र त्यातून मुलांना येणारी निराशा कशी घालवायची हा एक प्रश्न निर्माण होणार आहे.
कारोनामुळे ऑनलाईन अभ्यासक्रम आणि त्याचे पर्याय समोर आले असले, तरी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना हे शक्य होईलच असे नाही. यामुळे शाळा सुरू झाल्या पाहिजे. त्या नव्या स्वरूपात आणि योग्य खबरदारी घेऊन सुरू झाल्या पाहिजे. यापुढे सोशल डिस्टन्सचा विषय हा कायमच असल्याचे मत संस्थाचालक शांताराम अगिवले यांनी व्यक्त केले.
शालेय शिक्षण विभागात मागील चाळीस वर्षांमध्ये अध्ययन आणि त्यासाठीच्या विकसित पद्धतींवर काम करणारे माजी शिक्षण उपसंचालक राम पवार म्हणतात, की शाळा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू झाल्या नाहीत, तर त्याचे अनेक परिणाम होणार आहेत. मात्र त्यावर पर्यायही आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रातील शाळांना शनिवारी असलेली अर्ध्या दिवसांची सुट्टी टाळून अनेक तास वाचवता येतील. दिवाळीच्या सुट्टीतील वेळेचा वापर करता येईल. त्यासोबतच सध्या सगळीकडेच ऑनलाईन आणि होम फॉर स्टडीचाही मोठा गाजावाजा होत आहे. सॅटेलाईट आणि उपग्रह वाहिन्याही सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र अध्यापन पूरक साधने म्हणूनच याकडे पाहिले पाहिजे. शिक्षकांची उणीव भरून काढता येत नाही. ऑनलाईन शिक्षणामुळे माहिती मिळेल, परंतु ज्ञान मिळेलच असे नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले.
शाळांच्या वेळापत्रकावर मुख्याध्यापक संघटनेचे सचिव व मुख्याध्यापक प्रशांत रेडीज यांनी तर जोपर्यंत कोवीडची लस येत नाही, तोपर्यंत शाळा सुरू करू नये, असे मत व्यक्त केले. राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित शाळांची स्थिती लक्षात घेता प्रत्येक वर्गात ३० ते ६० हून अधिक विद्यार्थी बसवलेले असतात. त्यांचे सोशल डिस्टसिंग कसे करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शाळा पुढे काही महिन्यांनी सुरू झाल्या, तरी शिक्षक, मुख्याध्यापक त्यासाठीचे नियोजन करतील. मात्र हे संकट दूर होईपर्यंत शिक्षण व्यवस्थेतच बदल करण्यासाठी पॅकेज अथवा त्याचे वेगळे नियोजन करावे अशी मागणी त्यांनी केली. ऑनलाईन शिक्षणावर रेडीज म्हणाले, की मुंबईसारख्या शहरांमध्येही अनेक पालकांकडे तसे मोबाईल आणि यंत्रणा नसते. त्यातच अनेकांची रिचार्ज करण्याची ऐपत नसते. त्यासाठी या सर्व गोष्टींचा विचार कोणी करत नाही, असेही ते म्हणाले. यादरम्यान बाल हक्कांचा विषय समोर येऊ शकतो, त्यामुळे लस येण्यापूर्वी जर शाळा सुरू केल्या, तर अनेक शहरांमध्ये अणुस्फोटासारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी भीतीही रेडीज यांनी व्यक्त केली.
मुंबईतील मराठी शाळेतील सहायक शिक्षिका वैशाली नाडकर्णी म्हणतात, शाळा उशिरा सुरू झाल्या, तरी त्यासाठीचे नियोजन करणे शक्य आहे. नियोजित सत्रांमधील काही पार्ट वगळले, काही ऑनलाईन आणि काही कृती अभ्यासक्रमावर भर देऊन यातून मार्ग काढता येतील, असेही त्या म्हणाल्या. पहिल्या सत्राला उशिर झाला तरी दुसऱ्या सत्रात सुट्टया आणि वेळेचे नियोजन करणे शक्य आहे. विद्यार्थ्यांचे कुठेही नुकसान होणार नाही, याची खबरदारी शिक्षक घेतील असेही त्या म्हणाल्या.
कोरोनाचा परिणाम; जूनमध्ये शाळा पुन्हा सुरू होतील ? विद्यार्थ्यांसह पालक साशंक
नागपूरमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जूनमध्ये शाळा पुन्हा सुरू होतील का, या प्रश्नाकडे संपूर्ण विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे. कोरोनामुळे वार्षिक परीक्षेपासून मुक्ती मिळाली असली, तरी अनेक खासगी शाळांनी ऑनलाइन शिकवणीवर्ग सुरू केले आहेत. त्या तुलनेत सरकारी शाळांना मात्र ऑनलाइनचा फंडा अजूनही उमगलेला नाही. साधारणपणे जूनच्या मध्यापर्यंत म्हणजेच उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर शाळा पुन्हा उघडल्या जातात. मात्र यावर्षी मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने कोरोनामुळे वाया गेल्याने जून महिन्यात शाळा उघडतील याबाबत शिक्षण विभाग आणि शिक्षकांसह पालकांच्या मनात देखील शंका आहे.
दुसरीकडे कोरोनामुळे संपूर्ण सुट्या वाया गेल्याने काही विद्यार्थ्यांना पुन्हा शाळा सुरू कधी होते, असा प्रश्न पडला आहे. त्यामागील त्यांची भावना देखील स्पष्ट आहे. शाळा सुरू झाल्यास पुन्हा धमाल-मस्ती करायला मिळेल. नियोजित वेळेत शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत, तर विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. एका अंदाजानुसार विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे, म्हणून शाळा सुरू होण्यासाठी आणखी दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ जाऊ द्यावा लागणार आहे. त्यामुळेच खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध करून काही प्रमाणात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोना विषाणूंचा सर्वाधिक संसर्ग महाराष्ट्रातच दिसून येतो. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सुद्धा टाळेबंदीच्या बंधनात अडकलेला आहे. गर्दीचे ठिकाण कोरोनाला पोषक असल्याने मॉल, जिम, शाळा, महाविद्यालयासह खासगी आणि शासकीय कार्यालये बंद करण्यात आली आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. परिस्थिती हळूहळू बदलत असली, तरी जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेले नाही. येणाऱ्या काळात कोरोनाला सोबत घेऊनच दिवस काढावे लागतील, हे स्पष्ट होऊ लागल्याने काही अंशी संचारबंदीत जिल्हा पातळीवर शिथिलता द्यायला सुरूवात झाली आहे. मात्र शाळांना इतक्यात सूट मिळेल, अशी शक्यता नाही. केंद्र सरकार या संदर्भात काय दिशानिर्देश देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.