नागपूर - अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पथकाने सुगंधित तंबाखूची साठवण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली आहे. सुगंधित तंबाखूवर राज्यात प्रतिबंधित आहे. एफडीए च्या पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे २० लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.
शहरातील मेडिकल चौकातील अंकुश शिवनारायण जयस्वाल यांच्या मालकीच्या रुपेश ट्रेडर्स येथे सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा असल्याची माहिती अन्न आणि औषधी प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एफडीएच्या एका पथकाने रुपेश ट्रेडिंगवर छापा टाकला. त्यावेळी त्या ठिकाणी राज्य शासनाने राज्यात विक्री व साठवणुकीसाठी प्रतिबंधित केलेला विविध कंपन्यांचा आणि विविध नावे असलेला सुगंधित तंबाखू आणि पान मसाला आढळून आला. हा संपूर्ण मुद्देमाल सुमारे २० लाख रुपये किमतीचा आहे. तो अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ अंतर्गत जप्त करून ताब्यात घेण्यात आला असून आरोपी आणि रुपेश ट्रेडिंगच्या संचालकांविरुद्ध प्रतिबंधित अन्न पदार्थ साठवणूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.