नागपूर- लॉकडाऊनमध्ये गरोदर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची वेळोवेळी तपासणी होणे तसेच आवश्यक लसीकरण करणे गरजेचे आहे. कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशात गरोदर महिलांच्या संदर्भात संभाव्य धोके टाळण्यासाठी महानगरपालिकेने आरोग्य तपासणीसाठी विशेष पथक स्थापन केली आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून यासाठी विशेष रुग्णवाहिका तयार करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेद्वारे स्त्री रोग तज्ज्ञ गरोदर महिलांच्या रहिवासी क्षेत्रात जाऊन त्यांची तपासणी करीत आहेत. शहरातील मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा भागामध्ये पथकाद्वारे गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील कोरोना संसर्गाचे 'हॉटस्पॉट' प्रतिबंधीत करण्यात आले आहेत. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत या प्रतिबंधीत क्षेत्रातील अतिधोकादायक गटातील व्यक्ती शोधण्यात आल्या आहेत. याचाच पुढचा भाग म्हणून या ठिकाणच्या गरोदर महिला शोधून त्यांची आरोग्य तपासणी मनपाद्वारे करण्यात येत आहे. विशेष म्हणजे तपासणीसाठी या महिलांना कोणत्याही रुग्णालयात जायची गरज नाही. त्या राहत असलेल्या ठिकाणी मनपाचे पथक येईल व स्त्री रोग तज्ज्ञांमार्फत आवश्यक त्या सर्व तपासण्या केल्या जातील.
गरोदर महिलांची रक्त, लघवी तपासणी किंवा लसीकरण आणि आवश्यक औषधोपचार या सर्व सुविधा मनपाद्वारे घरपोच देण्यात येत आहेत. कोरोना संसर्गाचे 'हॉटस्पॉट' ठरलेल्या सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा भागात जाऊन येथील गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जन्माला येणाऱ्या बाळाला कोणत्याही धोका राहू नये, आई आणि बाळाचे आरोग्य चांगले रहावे या उद्देशाने मनपाद्वारे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
गरोदर महिलांचे संभाव्य धोके टाळण्यासाठी त्यांच्या आरोग्य तपासणीसह त्यांचा कोरोना चाचणीसाठी 'स्वॅब'ही घेण्यात घेण्यात येत आहे. यासाठी महिलांना विलगीकरण कक्षात राहण्याची गरज नाही. 'स्वॅब'चा अहवाल निगेटिव्ह राहिल्यास त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. मात्र 'स्वॅब'चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार केले जातील, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.