नागपूर - मला तर भीती वाटते की आमच्या एखाद्या शिवसैनिकाची वडापावची गाडी असेल तरी त्यावर ईडी (ED) कारवाई करेल, अशी मिश्किल प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. मुख्यमंत्र्यांचे मेव्हुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने कारवाई केली होती, त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. देशासमोर इतरही महत्वाचे प्रश्न आहेत असे म्हणत राऊत यानी महागाई आणि इंधन दरवाढीला धरून सरकारवर हल्ला चढवला आहे. ते आज नागपुरात बोलत होते.
देशापुढे मूळ समस्या 'महागाई': इंधनाचे दर वाढले आहेत. अनेक दिवसांनंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तेलाच्या वाढत्या दराबद्दल वादंग झाला आहे. संसद चालू शकली नाही. आता निवडणूक संपली आहे. भाजपचा हा खेळ आहे लोकं त्यात फसतात. मात्र, लवकरच देशात महागाई विरोधात माहोल तयार होईल. मूळ समस्या रशिया किंवा युक्रेन नाही, हिजाब नाही. तर महागाई, बेरोजगारी या मूळ समस्या आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
सुडाच्या कारवाईसाठी केंद्रीय तपास यंत्रणेकडून प्रशिक्षण घ्यावे लागेल : महाराष्ट्र आणि बंगालमध्ये राज्यपाल फक्त राज्य सरकारांवर निशाणे साधतात. इतरही राज्यात राज्यपाल आहेत, इतरही राज्यात ईडीचे कार्यालय आहेत. मात्र, तिथे असे काही होत नाही. फक्त महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये का होते? याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या, असे राऊत म्हणाले. तसेच केंद्रीय तपास यंत्रणा सूडाच्या भावनेने तपास आणि कारवाई करत आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्राचा गृह विभाग किंवा महाराष्ट्र सरकार कधीच करणार नाही. महाराष्ट्राच्या गृह विभागाला एक प्रतिष्ठा, परंपरा आहे. ते कायद्याचे पालन करूनच कारवाई करतील. विरोधी पक्षनेते कितीही बोंबलले की सुडाची कारवाई सुरू आहे, तरी आम्हाला सूडाची कारवाई करायची नाही. जर आम्हाला सूडाची कारवाई करायची असेल तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून प्रशिक्षण घ्यावे लागेल, असे संजय राऊत म्हणाले.
ही परंपरा आहे : मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतल्यापासून वर्षा बंगल्यावर अनेक वेळेला आमदारांना जेवणासाठी बोलावले जात ही परंपरा आहे. अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षाला चहापानाला बोलावतात, तर अधिवेशनाच्या काळात महाविकास आघाडीच्या आमदारांना जेवायला बोलावले जाते, यांत नवीन काही नाही. विदर्भातून मंत्रिमंडळात शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी मुख्यमंत्री गांभीर्याने विचार करत आहेत. लवकरच मुख्यमंत्री त्यासंदर्भात निर्णय घेतील, असेही राऊत म्हणाले
माझा दबाव नाही : माझ्याकडे घोटाळ्याची माहिती होती. ती मी महाराष्ट्र सरकार आणि तपास यंत्रणांना सोपवली आहे. आता काम तपास यंत्रणांना करायचे आहे. त्यांना त्या पुराव्यांमध्ये काही दम वाटत असेल, तर ते कारवाई करतील. माझा काही त्यांच्यावर दबाव नाही. तपास यंत्रणा स्वतंत्र आहेत, त्यामुळे त्यांनी कारवाई करायला पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले.
तर देशातले वातावरण बिघडेल : कर्नाटकात मुस्लिमांना जत्रांमध्ये दुकान लावण्यास मज्जाव केला जात आहे. हे खूपच चुकीचे आहे. जर असे होणार असेल, तर देशाचे वातावरण बिघडेल आणि विभाजन स्थिती निर्माण होईल. ओवैसी यांनी उत्तर प्रदेशातील सर्व कार्यकारणी भंग केली आहे. तिथे भाजप जिंकले आहे, त्यामुळे त्यांचे काम झाले आहे, असे संजय राऊत म्हणाले.