नागपूर - कोरोना काळामध्ये जीवनदायी ठरलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वायुदल व रेल्वेच्या मदतीने ओडिसा राज्यातून चार ऑक्सिजन टँकर शहरात पोहोचले आहेत. त्यामुळे ५८ मेट्रिक टन ऑक्सिजनचा अतिरिक्त पुरवठा शनिवारी झाला आहे. त्यामुळे एकूण १६९ मेट्रीक टन पुरवठा करण्यात आला. ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी तातडीच्या पुरवठयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
दोन दिवसापूर्वी वायू दलाच्या विशेष विमानाने चार टँकर ओडिसाची राजधानी भुवनेश्वर नजीकच्या अंगुळ येथील स्टील प्लांटसाठी रवाना करण्यात आले होते. ते सर्व टँकर ऑक्सिजन भरून नागपूरला परत आले आहेत. भिलाई येथून होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याव्यतिरिक्त हा ऑक्सिजन नागपूर शहराला मिळाला आहे. त्याकरिता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. शनिवारी भिलाई आणि अंगूळ येथून एकूण १६९ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यापैकी जिल्ह्यातील ऑक्सिजन रिफिलिंग सेंटरला ६२ मेट्रिक टन व मेडिकल व अन्य रुग्णालयांना ७१ मेट्रिक टनाचे वितरण करण्यात आले आहे.
३ हजार ८६७ रेमडेसिवीर प्राप्त -
नागपूर जिल्ह्यासाठी जिल्हा प्रशासनाला शनिवारी ३ हजार ८६७ रेमडेसिवीर प्राप्त झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून आवश्यकतेनुसार सर्व मागणी करणाऱ्या हॉस्पिटलला याचे वितरण केले जाणार आहे. तथापि, हॉस्पिटलकडून होणारी मागणी आणि होणारा पुरवठा अत्यंत कमी असून यासंदर्भात सातत्यपूर्ण पाठपुरावा जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे.
२९ हजार लसीची खेप प्राप्त -
नागपूर जिल्ह्यामध्ये 45 वर्षावरील नागरिकांना पुरवण्या प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाला २९ हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. यामधील १४ हजार ५०० शहर व १४ हजार ५०० ग्रामीण भागात वितरण करण्यात आले असून या उपलब्ध लसीतून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात या लसीची देखील मागणी नोंदविली आहे.