नागपूर - ख्वाजा युनूस मर्डर प्रकरण सुरू असताना सचिन वाझेला परत सेवेत सामावून घेणे ही सरकारची खूप मोठी चूक होती असा आरोप समाजवादी पार्टी चे नेते आमदार अबू आझमी यांनी केला आहे. ते आज नागपूर विमानतळावर पत्रकारांसोबत बोलत असताना त्यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.
'त्याचवेळी निलंबित करायला हवे होते'
सचिन वाझेला पोलीस दलात सामावून घेतल्याचे मला समजल्याबरोबर मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, संजय राऊत आणि अनिल देशमुख यांची भेट घेतली. तेव्हा सचिन वाझेला सेवेत सामावून घेण्याला मी विरोध केला होता. मात्र परमबीर सिंग यांनी या नेत्यांना काय सांगून वाझेला सेवेत घेतले हे कळू शकले नसल्याचे ते म्हणाले आहेत. ज्या दिवशी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझेच्या बाबतीत खुलासे केले होते, त्याचवेळी सरकारने वाझेला निलंबित करायला पाहिजे होते, असेही ते म्हणाले आहेत. मी सत्तेत असतानादेखील मान्य करतो, की या प्रकरणात सत्तापक्षाची यामध्ये मोठी चूक झाली आहे.
'परमबीर सिंगांविरुद्ध अनेक तक्रारी'
ज्यावेळी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना शंभर कोटी रुपयांच्या वसुलीसंदर्भात माहिती मिळाली होती, तेव्हा त्यांनी यासंदर्भात शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट का घेतली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. वसुलीसंदर्भात सिंग यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.