मुंबई - १४ जूनला सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर काही दिवसांतच संदीप सिंहने भाजपच्या एका नेत्याला भेटून ब्रिफिंग दिले तो नेता कोण? याची चौकशी केल्यास ते स्पष्ट होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केले आहे. संदीप सिंह आणि भाजप यांच्या संबधाबाबत ‘ये रिश्ता क्या कहलाता है’? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
सुशांतसिंह राजूपत मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे भाजपपर्यंत पोहोचत आहेत हे आता प्रकाशात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपट बनवणाऱ्या संदीप सिंहचे नाव सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात ड्रग संदर्भात जोडले गेले. हे पाहता संदीप सिंह, भाजप व ड्रग माफिया यांच्यातील संबंधावर प्रकाश पडत आहे, असे सावंत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-सुशांतसिंह मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्तीची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू
संदीप सिंहच्या कंपनीचा आर्थिक ताळेबंद पाहता त्याच्या कंपनीला २०१७ मध्ये ६६ लाखांचे नुकसान झाले होते. २०१८ मध्ये ६१ लाखांचा फायदा तर पुन्हा २०१९ मध्ये ४ लाखांचे नुकसान झाल्याचे दिसते. या तोट्यातील कंपनीबरोबर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमात १७७ कोटी रुपयांचा सामंजस्य करार कसा काय केला? ही कंपनी पैसे कोठून आणणार होती? मोदींच्या बायोपीकच्या बदल्यात हा करार झाला का? संदीप सिंहवर भाजप एवढा मेहरबान का झाला ? या प्रशांची उत्तरे मिळाली पाहिजेत,असे सचिन सावंत म्हणाले आहेत.
संदीप सिंहने भाजपच्या कार्यालयात ते ५३ फोन कोणाला केले होते, याचीही स्पष्टता अजून होत नाही. ज्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत, अशा व्यक्तीची शहानिशा न करताच त्याच्या कंपनीशी करार कसा काय केला हेही आश्चर्यकारक आहे. हे सर्व पाहता सखोल चौकशी केल्यास यातून बऱ्याच धक्कादायक गोष्टी स्पष्ट होतील, असे सावंत यांनी म्हटले आहे.