नागपूर - सध्याच्या घडीला हिंदुत्वाच्या जो अर्थ लावला जातो तो अर्थ म्हणजे हिंदुत्व नाही, तर हिंदुत्व हे धर्मनिरपेक्षतेचे एक रुप आहे. धर्मसंसदेत हिंदुत्वाच्या नावावर जी वक्तव्ये समोर आले ते सुद्धा हिंदुत्व नाही, असे भाष्य सरसंघचालक मोहन भागवत ( Rss Chief Mohan Bhagwat On Hindutva ) यांनी केले. ते नागपुरात एका कार्यक्रमात बोलत होते.
हरिद्वार असो की रायपूर धर्मसंसदेच्या मुद्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्माच्या नावावर केलेल्या बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा नाव न घेता समाचार घेतला. यावेळी उदाहरण देताना त्यांनी म्हटलं की, "द्वेषभावात असंतुलित होऊन मी जरी काही बोलत असले तर ती माझी चूक असेल ते हिंदुत्व होऊ शकत नाही. भारत हा कितीही बलशाली झाला तरी तो युद्धाची भाषा करणार नाही तो गीतेचीच भाषा करेल ते खरं हिंदुत्व आहे."
"हिंदुत्वात जात, पंथ मतभेदाला स्थान नाही. सर्वांना जोडणाऱ्या तत्वाचा विसर पडला तर, देश तुटेल हे इंग्रजांना माहिती होते. त्यांनी तसा प्रयत्न केला. आताही धर्माच्या नावावर देश तोडण्याचे षडयंत्र सुरू आहेच. हिंदुत्व कुठल्याही अतिरेक्यांवर विश्वास ठेवत नाही. जातीच्या वर्चस्वाची बाब ही विकृती आहे. खऱ्या हिंदुत्वातून जातीभेद दूर होऊ शकतो," असेही सरसंघचालकांनी स्पष्ट केले.
राष्ट्रपती असताना प्रणव मुखर्जी म्हणाले...
यावेळी मोहन भागवत यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशी भेट झाल्याची आठवण सांगितली आहे. घरवापसीवरून सुरू असलेल्या वादावर चर्चा करतांना प्रणव मुखर्जी यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, नंतर ते म्हणाले की, "जर संघाने हे घर वापसीचे काम हाती घेतले नसते तर ३० टक्के समाज देशापासून दूर झाला असता. जगातील सर्वात धर्मनिरपेक्ष संविधान जर कुठल्या देशाचे असेल तर ते भारताचे आहे. पण, संविधान जरी आज अस्तित्वात आले तरी देशाला पाच हजार वर्षांची धर्मनिरपेक्षतेची परंपरा आहे," असे म्हणाल्याचे सरसंघचालक भागवत यांनी ( Mohan Bhagwat On Pranav Mukherjee ) सांगितले आहे.
सेक्युलर हा शब्द विदेशी वातावरणातील
"जरी भारतात धर्म वेगळा, भिन्न विचारधारा, बहुभाषि असले तरी यातही एकतेची धारणा भारतीयांनी जपली. राज्यघटनेत उल्लेख आहे, म्हणून भारत धर्मनिरपेक्ष नाही तर तो पूर्वापार तसा चालत आला आहे म्हणून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत तसा उल्लेख केला. सेक्युलर हा शब्द विदेशी वातावरणातील आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेत धर्मनिरपेक्षता शब्द नव्हता. कारण, ती आपली परंपराच आहे, असे त्यांचे मानणे होते. पूजापद्धती वेगळ्या असल्या तरी पूर्वजांनी एकात्मतेची शाश्वत परंपरा मोठी केली. विविधतांना स्वीकार करून, त्यांचा सन्मान करून त्यांच्या मोक्षाची संधी देणारा विचार म्हणजे हिंदुत्व आहे," असेही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
काय आहे 'धर्मसंसद' प्रकरण?
हरिद्वारमध्ये १७ ते १९ डिसेंबर या तीन दिवसांमध्ये एक सभा पार पडली. आयोजकांनी याला ‘धर्म संसद’ असं नाव दिलं होतं. या सभेसाठी देशभरातील मठ आणि मंदिरांचे प्रमुख सहभागी झाले होते. एकूण १५० सहभागी व्यक्तींमध्ये सुमारे ५० महामंडलेश्वर देखील होते. या सभेमध्ये मुस्लिमांविरोधात द्वेषपूर्ण भाषणं केली गेली. नरसंहार आणि मुस्लिमांविरुद्ध शस्त्रे वापरण्याच्या खुले आवाहन या सभेत करण्यात आले होते. तसेच, या सभेत महाराष्ट्रातील कालीचरण महाराजाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात अपशब्द वापरले होते.
हेही वाचा - लता मंगेशकर दुखवटा, राज्यातील केंद्रिय बँकाही राहणार बंद