नागपूर - प्रेसक्लब येथे पत्रकार परिषद घेत सुरज तातोडे आणि अॅड. सतिष उके यांनी गंभीर आरोप केले. सुरज हा गेल्या अनेक वर्षांपासून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कार्यरत होता. मंत्रीपदावर असताना त्याला जवळपास 25 हजार महिना पगार मिळत होता.अनेक रस्त्याच्या कंत्राटदार कंपन्यांकडून कोट्यावधीच्या रक्कमेची वसुली आणि त्याचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती असा दावा सुरज तातोडे यांनी केला आहे. जवळपास शंभर कोटी रुपयांच्यावर वसुली केल्याचेही त्यांनी सांगितले. बावनकुळे यांनी मात्र हे सगळे आरोप धादांत खोटे आहेत असे सांगत या प्रकरणी अॅड. सतिष उके यांच्या विरोधात 50 कोटींचा दावा दाखल करणार असल्याचे म्हणले आहे.
कमिशनची नोंद नसल्याने वाद
एकेकाळी बावनकुळे यांचा विश्वासू असणाऱ्या सुरज कडे ओरिएंटल कंपनीचा सोमनाथ नामक व्यक्ती टप्प्या टप्प्याने साडेसात कोटी आणुन देणार होता. एक दिवशी त्याने 1 कोटी रुपयांची रक्कम आणून दिल्यानंतर त्याला कमिशन म्हणून जवळपास 30 लाख रुपये परत देण्यास बावनकुळे यांनी सांगीतले. पण या सगळ्या व्यववहाराची नोंद ज्या डायरीत सुरज करत होता त्यात 1 कोटी आल्याची नोंद झाली, पण 30 लाख कमिशन म्हणून परत गेल्याची नोंद झाली नाही. त्यामुळे या प्रकरणात बावनकुळे आणि तातोडे यांच्यात वितुष्ट आले. त्यानंतर बावनकुळे यांनी सुरज वर गंभीर आरोप केले. त्यामुळे त्याला अर्धांगवायू होऊन प्रकृती बिघडल्याचा दावा सुरजने केला आहे.
जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
प्रकृती बिघडल्याने काम गेले तसेच सुरज तातोडे याचा नावावर असलेल्या रामदासपेठ येथील तीन फ्लॅट, नोएडा येथील फ्लॅट, शेती, 10 ट्रक, दोन लक्झरी वाहन यासह अन्य प्रॉपर्टी बावनकुळे यांनी दबाव आणून खरेदी दाखवुन बळकावल्याच आरोप सुरजने केला. यात बावनकुळे यांचे काही संबंधित व्यक्ती अजूनही जीवे मारण्याची धमकी देत असून कुटुंबाला आणि त्यांच्या जीवाला धोका आहे, तसेच बावनकुळे यांनी जबरदस्तीने बळकावलेली संपत्ती परत द्यावी अशी मागणी सुरज तातोडेने केली आहे.
चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
या प्रकरणात अॅड. सतिष उके यांनी सांगितलेकी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री पदावर असताना मोठ्या प्रमाणात कंत्राटी कंपन्यांना फायदा पोहोचून भ्रष्टाचार केला आणि हजारो कोटी रुपयांची संपत्ती मिळवली. यात जवळपास शंभर कोटी रुपयांचा भष्ट्राचार झाल्याचे पुरावे आहेत असा आरोप त्यांनी केला. त्यामध्ये सुरज तातोडे यांनी केलेल्या आरोपाचे आधारावर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपत्तीची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. ज्या पद्धतीने केवळ आरोपाच्या आधारावर माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर चौकशी सुरू आहे. त्याच धर्तीवर पुरावे असताना तशाच पद्धतीने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी उके यांनी केली.
ते आरोप धदांत खोटे, 50 कोटींचा दावा दाखल करणार- बावनकुळे,
भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र हे सगळे आरोप धदांत खोटे असून या विरोधात आज पन्नास कोटी रुपयांचा दावा दाखल करणार असल्याची माहिती दिली. ॲड सतिश उके यांनी केलेले आरोप धातांद खोटे आणि कपोलकल्पित आहे. नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणूकीत मी माझ्या संपती विषयीची माहिती शपथ पात्रता दिली आहे. तरिही उके यांनी खोटे आरोप केले. ते कुणाच्या इशाऱ्यावरुन आरोप करतात, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा आणि फौजदारी तक्रार दाखल करणार असेही त्यांंनी सांगितले.
सतिष उके हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जवळचे असल्याचे मानले जाते. नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी अॅड. सतिष उके यांनी तथाकथित मोदीना म्हणजेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्या मोदी विरोधात वक्तव्य केले तथाकथित मोदीला समोर आणले होते.
उमेश घरडे उर्फ मोदी असल्याचा माध्यमांसमोर सादर केले होते. यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मागील काही दिवसांपासून करत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना मेंटल हॉस्पिटल मध्ये पाठवावे अशी मागणी केली. तसेच काँग्रेसच्या सोनिया गांधी यांना पत्र लिहून नाना पटोले यामची काँग्रेस पक्षातून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी लिहलेल्या पत्रात केली होती. त्यानंतरच सोमवारी संध्याकाळी ही पत्रकार परिषद घेऊन सतिष उके आणि सुरज तातोडे यांनी बावनकुळे यांच्यावर भष्ट्राचाराचे गंभीर आरोप केले होते.