नागपूर - महिला व बालकल्याण विकासमंत्री यशोमती ठाकूर यांच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली. पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण केल्याप्रकरणी यशोमती ठाकूर यांना अमरावती न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या निकालाच्या विरोधात त्यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. ज्यावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
हे प्रकरण सुमारे आठ वर्षं जुने आहे. एका वाहतूक पोलिसाने यशोमती ठाकूर यांचे वाहन अडवून कारवाई केली होती. त्यानंतर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी ॲड. यशोमती ठाकूर यांच्यासह वाहनचालक व दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा करण्यात आला होता. गेल्या आठवड्यातच अमरावती न्यायालयाने त्यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला केला होता. अमरावती न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
त्यानंतर अमरावती न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेच्या विरोधात यशोमती ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागितली होती. ज्यावर आज सुनावणी झाली. नागपूर खंडपीठाने अमरावती न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली असून पोलिसांना नोटीस बजावली आहे.