नागपूर - कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे शहरात व जिल्ह्यात असलेल्या कोरोना उपचार रुग्णालयांमधील खाटांची संख्या वाढविण्यात यावी तसेच कोरोना नियंत्रणासाठीच्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे लागू कराव्यात असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिलेत. कोरोना उपचारासोबतच १८ वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यासाठी नियोजन करून ही मोहीम प्रभावीपणे राबवावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, आमदार अभिजीत वंजारी, विभागीय आयुक्त संजीव कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, ग्रामीण पोलीस आयुक्त राकेश ओला, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यावेळी उपस्थित होते.
कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे बाधित रुग्णांना उपचाराच्या दृष्टीने नागपूर शहर तसेच जिल्ह्यात कोविड रुग्णालयात सुविधा वाढविणे आवश्यक आहे. दररोज सरासरी सात हजार रुग्णांची भर पडत असल्याने रुग्णालयातील सुविधा अपूर्ण आहेत. त्यामुळे मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे तसेच महापालिकेच्या रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले. वाढीव बेड निर्माण करताना ऑक्सीजनचा पुरवठा करण्याच्या संदर्भात तयारी झाली आहे. भिलाई, राऊरकेला तसेच जिह्यातील ११ प्रकल्पातून शहरात ऑक्सीजनचा पुरवठा सुरू झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
रुग्णालयांचे फायर अँड सेफ्टी ऑडीट करा -
राज्यातील नागपूर, नाशिक, मुंबई आदी शहरातील घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नागपूर शहरात असलेले व जिल्ह्यातील सर्व शासकीय, खाजगी रुग्णालयांचे फायर अँड सेफ्टी ऑडिट करण्याबाबतच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या, फायर अँड सेफ्टी ऑडिटचा अहवाल प्रशासनाला तात्काळ सादर करा, असे निर्देशही डॉ. राऊत यांनी यावेळी दिले.
लसीकरणाला प्राधान्य -
अठरा वर्षांवरील सर्वांचे लसीकरण येत्या १ मे पासून सुरू होत आहे. त्यासाठी केंद्र शासनाने ऑनलाईन नोंदणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातही 18 वर्षावरील सर्व नागरिकांना लस द्यायची आहे. या लसीकरण मोहिमेसाठी प्रशासनाने कालबद्ध नियोजन करावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. शहरात 187 व ग्रामीण भागात 177 लसीकरण केंद्र असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण आवश्यक असून जिल्ह्यातील दररोज 1 लाख जणांना लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवावे व त्यानुसार केंद्र सरकारकडे लसीची मागणी करावी, असे निर्देश डॉ. राऊत यांनी यावेळी दिले.