नागपूर- फेब्रुवारी तसेच मार्च महिन्यात नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहातील 3 कैद्यांचा मृत्यु झाला होता. मृत झालेल्या कैद्यांच्या कुटुंबियांनी कैद्यांच्या मृत्यू संदर्भात अनेक गंभीर आरोप केले आहेत. कैद्यांच्या मृत्यु बाबतची चौकशी उपविभागीय दंडाधिकारी नागपूर शहर यांच्या मार्फत करण्यात येणार आहेत. यासंदर्भात चैकशी ( Inquiry into death prisoners) करण्याचे आदेश नागपूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आर. विमला यांनी दिले आहेत.
दंडाधिकारी करणार चौकशी - कैद्यांच्या मृत्यूच्या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्यांना चौकशीत सहभागी होता येणार आहे. कैद्याचे मृत्युबाबत त्या घटनेची कारणे आणि परिस्थिती, मृतकांच्या मृत्युस कारणीभूत असलेली इतर संयुक्तिक कारणे, शासन यंत्रणेकडून झालेली दिरंगाई तसेच दाखल करण्यात आलेले खोटे अहवाल याबाबींवर उपविभागीय दंडाधिकारी चौकशी करणार आहेत.
दरम्यान, ११ मार्च रोजी नरेंद्र राजेश वाहाने (39) यांचा कारागृहात मृत्यू झाला होता, तर 26 फेब्रुवारी रोजी दुर्गेश ऊर्फ छल्ला धृपसिंग चौधरी (31) यांचा देखील मृत्यू झाला होता. याशिवाय सोनु ऊर्फ सोहेल साहेबखॉन बाबुखाँन (27) यांचा मृत्यू 28 फेब्रुवारीला झाला होता. मृत झालेल्या कैद्यांच्या कुटुंबियांनी कैद्यांच्या मृत्यू संदर्भात अनेक गंभीर आरोप केले आहेत. या प्रकणाची गंभीर दखल घेत, जिल्हा दंडाधिकारी आर. विमला यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.