नागपूर - जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात घोगरा गावालगत असलेल्या कापूस जिनिंग मिलमध्ये आग लागली. या आगीत जिनिंग मिलमध्ये ठेवलेला कापूस मोठ्या प्रमाणात जळाला असल्याची माहिती समोर आली आहे. प्रथमतः ही आग मिलच्या आवारात साठवलेल्या कापसाच्या ढिगांना लागल्याने शेकडो क्विंटल कापूस जळाला आहे. आगीत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
किसन गोरे असे मृताचे नाव असून तो कापूस जीनमध्ये सुरक्षारक्षक होता. अंदाजे १२ हजार क्विंटल कापूस आणि दीड हजार कापसाच्या गाठी असा लाखोंचा माल आगीत जळून राख झाला आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. दान कॉटन इंडस्ट्रीज, असे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या मिलचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी पणन महासंघाकडून कापसाची खरेदीही सुरू होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी केलेला कापूस त्या ठिकाणी होता.