नागपूर - गेल्या दोन दिवसांत नागपुरात कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. प्रशासनाने गरज लक्षात घेऊन अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काही बेड नागपूरच्या रुग्णांसाठी राखीव केले आहेत. तसेच पुढील काही दिवसांमध्ये ग्रामीण भागात देखील ऑक्सिजन बेडची उपलब्धता करण्यात येणार आहे. मात्र या काळात ग्रामीण भागातील रुग्णांनी कोणताही वेळ न दवडता ताप, अंगदुखी, सर्दी-पडसं, वास न येणे ही लक्षणे जाणवल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.
शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. गेल्या दोन तीन दिवसांपासून रुग्णसंख्या ही 5 हजारांच्यावर जात आहे. अशा परिस्थितीत प्रशासन युद्धस्तरावर नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करत आहे. यासाठी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसोबत संपर्क साधण्यात आला असून, कालपासून काही रुग्ण त्या ठिकाणी देखील पाठवण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनी या परिस्थितीत मेयो मेडिकल, शालिनीताई मेघे हॉस्पिटल, लता मंगेशकर हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल या ठिकाणी बेडची उपलब्धता व अन्य माहितीसाठी कॉल सेंटरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
बेडची संख्या वाढवण्याचा प्रयत्न
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बेडची संख्या वाढविण्याचा जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने गठीत करण्यात आलेल्या समितीच्याही बैठकी सुरू आहेत. मात्र नागरिकांनी हे लक्षात घ्यावे की बेड, ऑक्सीजन बेड, व्हेन्टिलेटर या सगळयांना मर्यादा आहेत. त्यामुळे प्राथमिक अवस्थेतच संसर्गाला प्रतिबंध केला पाहीजे. त्यासाठी लवकर टेस्ट करणे गरजेचे आहे. कोरोनाला नियंत्रीत करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही जिल्ह्याधिकाऱ्यांनी केले आहे.
संचारबंदीचे पालन करावे
दरम्यान पुढील दोन दिवस नागपूर जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी करण्यात आली आहे. नागरिकांनी संचारबंदीचे पालन करावे, घराबाहेर पडू नये. असेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच सध्या जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून, अंदाजे 6 लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरीत लसीकरण पुढील 15 दिवसांमध्ये होईल अशी माहिती देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा - राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन आवश्यक - विजय वडेट्टीवार