नागपूर - रशिया आणि युक्रेन या दोन देशात सुरू असलेल्या युद्धमुळे जागतिक शांतता धोक्यात आली आहे. या युद्धाचे दुष्परिणाम भविष्यात सर्वांनाच भोगावे लागणार आहेत. त्यामुळेच युद्ध कुणालाही नको, हा संदेश देण्यासाठी वैदर्भीय कला अकादमीच्या पुढाकाराने प्रसिद्ध चित्रकार हरिहर पेंदे यांनी शांतीचे आवाहन करण्यासाठी एक चित्र रेखाटले आहे. कलेच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करू शकणाऱ्या सर्व शक्तींना या चित्राने एक आवाहन केले आहे. अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांच्या पायथ्याशी बसून हे चित्र रेखाटले आहे. वैदर्भीय कला अकादमीच्या उपक्रमाचे कलाक्षेतील मान्यवरांनी तसेच सर्व स्तरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे.
नागपूर शहरातील मध्यभागी असलेल्या व्हेरायटी चौकातील गांधी पुतळ्याखाली कुंचल्याच्या (ब्रश) माध्यमातून "नो वॉर विश्वशांती" या विषयावर युद्धाची भीषण स्थिती दाखवणार चित्र कॅनव्हास रेखाटले आहे. विदर्भातील ज्येष्ठ कलावंत असलेले हरिहर पेंदे यांनी ही पेंटिग साकारली आहे. या आधी सुद्धा त्यांनी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पेंटिंग साकारत शांतीचा संदेश दिला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. युद्धात हजारो निरपराध लोकांचे जीव जातात. त्यामुळे युद्ध होऊ नये, या करीता युद्ध स्थिती दाखवणारे पेंटिंग त्यांनी रेखाटली आहे.
महात्मा गांधीच्या पुतळ्याखाली रेखाटली पेंटिंग
जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सीताबर्डी येथील पुतळ्या खाली हरिहर पेंदे यांनी कडक उन्हात चित्र रेखाटले आहे. त्यांनी आपल्या कुंचल्यातून नो वॉर (युद्ध नको) चा संदेश देणारी पेंटिंग साकारली आहे. युद्ध जगाला विनाशाकडे नेणारे सिद्ध होईल, अशी भीती त्यांनी आपल्या चित्रातून व्यक्त केली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला धरून विश्वशांतीचा संदेश देण्याचे काम ही पेंटिंग करत आहे.
नो वॉर पेंटिंग
वैदर्भीय कला अकादमी ही संस्था सामाजिक बांधिलकी जपणारी आहे. सध्या युक्रेन आणि रशिया या दोन देशांमधले युद्ध हा जगात चर्चेचा विषय ठरले आहे. युद्ध हा कुठल्याही संघर्षाचा पर्याय नसून तो विनाशकारी आहे. आपल्या आजवरच्या लौकिकाला साजेसे एक चित्र वैदर्भीय कला अकादमीचे सुप्रसिद्ध चित्रकार हरिहर पेंदे यांनी आज सीताबर्डीवरील गांधी पुतळ्याच्या पायथ्याशी भव्य कॅनव्हासवर रेखाटले आहे.