नागपूर - कोविड-१९ ला न घाबरता काळजी घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे कुठलीही लक्षणे आढळली अथवा लक्षणे नसली तरी स्वत:ची कोविड चाचणी करवून घेणे आणि भीती असेल तर समुपदेशन करवून घेण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता शहरातील विविध भागात कोविडसंदर्भातील सर्व सेवा सुरू केल्या असून नागरिकांना आता आपल्या घराजवळच चाचणी, समुपदेशन व अन्य सेवा उपलब्ध झाल्या आहेत.
नागपूर शहरात २१ ठिकाणी असे सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा व पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या किंवा लक्षणे असल्यास आपली कोविड चाचणी करवून घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
नागपुरात सहा ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत चाचणी करता येईल. यामध्ये आशीनगर झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ७ मधील पाचपावली पोलीस वसाहत, धरमपेठ झोनअंतर्गत प्रभाग क्र. १४ मध्ये लॉ कॉलेज होस्टेल आणि रवि भवन, धरमपेठ झोनमधील प्रभाग क्र. १५ मध्ये मॉरिस कॉलेज होस्टेल, मंगळवारी झोनअंतर्गत प्रभाग क्र. १० मधील राज नगर आणि लक्ष्मीनगर झोनअंतर्गत प्रभाग क्र. ३७ मधील आर.पी.टी.एस. या ठिकाणी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त नागपूर महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ही सेवा उपलब्ध राहील.
धरमपेठ झोनअंतर्गत प्रभाग क्र. १३ मधील फुटाळा आणि तेलंगखेडी प्राथमिक आरोग्य केंद्र, मंगळवारी झोनअंतर्गत प्रभाग ९ मधील इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीबाग झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ८ मधील मोमीनपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र, लक्ष्मीनगर झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ३८ मधील जयताळा प्राथमिक आरोग्य केंद्र, सतरंजीपुरा झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. २० मधील जागनाथ बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, मंगळवारी झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ११ मधील झिंगाबाई टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीबाग झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. १९ मधील भालदारपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र, सतरंजीपुरा झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. २१ मधील शांतीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, नेहरुनगर झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. २६ मधील नंदनवन प्राथमिक आरोग्य केंद्र, लकडगंज झोनअंतर्गत प्रभाग क्र. २५ मधील पारडी प्राथमिक आरोग्य केंद्र, धंतोली झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ३३ मधील बाबुळखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र, लकडगंज झोनअंतर्गत प्रभाग क्र. २४ मध्ये असलेल्या डिप्टी सिग्नल प्राथमिक आरोग्य केंद्र, नेहरुनगर झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ३० मधील बिडीपेठ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि धरमपेठ झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. १३ मधील हजारीपहाड प्राथमिक आरोग्य केंद्र या केंद्रांचा समावेश आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागात एक असे एकूण ३८ कोविड टेस्टिंग सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न असून प्रत्येक नागरिकाला घराजवळ चाचणी करता यावी, हा त्यामागील उद्देश असल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले.
नागपूर शहरात कोविड-१९ मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याचे कारण कोविड-१९ चे उशिरा निदान होणे आणि अंतिम क्षणी उपचार होणे हे आहे. आता नागरिकांनीच चाचणीसाठी पुढाकार घेऊन लक्षणे असो अथवा नसो, प्रत्येकाने कोविड-१९ ची चाचणी करवून घेतल्यास लवकर निदान करता येईल. कोविड-१९, सारी सोबतच अन्य रक्त तपासणी करून निदान करण्यात येईल. त्यातून पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला आमदार निवास कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येईल. तेथे अन्य तपासण्या केल्यानंतर रुग्ण लक्षणे असलेला आहे, अथवा लक्षणे नसलेला आहे. सारीचा रुग्ण आहे यावरून कुठल्या रुग्णालयात उपचार घ्यायचे की गृह विलगीकरणात ठेवायचे त्यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेचे चमू मार्गदर्शन करेल, अशी माहितीही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.