नागपूर - महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीला विरोध सुरू झाला आहे. त्यांच्या जागी नेमणूक झालेले नवे आयुक्त म्हणून राधाकृष्णन बी हे उद्या म्हणजेच शुक्रवारी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती महापालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे.
महत्त्वाचं म्हणजे तुकाराम मुंढे कोरोनाबाधित असल्याने ते सध्या गृह विलगीकरणात आहेत. त्यामुळे नवे आयुक्त राधाकृष्ण बी हे तुकाराम मुंढे यांच्याकडून फोनवर संपर्क करून पदभार स्वीकार करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राधाकृष्णन बी २००८ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. त्यांची पहिली नेमणूक जालना जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी आणि नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून देखील काम केलेले आहे.
या शिवाय त्यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अध्यक्ष, मुंबई म्हाडाचे मुख्याधिकारी म्हणून त्यांनी यापूर्वी काम केलेले आहे. गेल्या महिनाभरापासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. राधाकृष्णन बी हे उद्या महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. तुकाराम मुंढे हे होम क्वारंटाईन असल्याने नवे आयुक्त फोनवरून पदभार स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.