नागपूर - लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी नागपूर पोलिसांनी आता ड्रोन कॅमेऱ्याची मदत घ्यायला सुरुवात केली आहे. या ड्रोनमुळे गर्दीवर नियंत्रण ठेवायला मदत तर मिळणारच आहे, शिवाय बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्याच्या दृष्टीनेसुद्धा ड्रोन उपयुक्त ठरणार आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागपुरात पोलीस, प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मात्र, तरीही शहरात अशा काही दाट वस्त्या आहेत, ज्या वस्त्यांमध्ये वाहनं पोहचू शकत नाही. अशा भागांमध्ये कोरोना संदर्भात जनजागृतीसाठी नागपुरात ड्रोनचा वापर केला जाणार आहे. या ड्रोनमध्ये स्पीकर बसवण्यात आले आहे हे विशेष. हे ड्रोन दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये फिरून जनजागृती करणार आहे.
रस्त्यांवर पोलीस असल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाकतात. मात्र, वस्त्यांमध्ये नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर निघतात. अशांनाही या ड्रोनच्या माध्यमातून घरात राहण्याचे आवाहन केले जाणार आहे. हा ड्रोन नागपूर पोलिसांच्या बिनतारी संदेश यंत्रणेने विकसित केला आहे.