नागपूर - नागपूर शहरातील तहसील पोलिसांना एका मोस्ट वॉन्टेड आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मोठे यश मिळाले आहे. इरशाद उर्फ इच्छू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो गेल्या तीन वर्षांपासून नागपूर शहरातील अनेक ठाण्यातील पोलिसांना गुंगारा देत होता. तहसील पोलिसांना त्याच्या संदर्भांत माहिती मिळाल्यानंतर तब्बल आठ दिवस त्याच्या घरावर पाळत ठेवण्यात आली. यासाठी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी वेषांतर देखील करावे लागल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी दिली आहे. तो इप्पा टोळीचा सक्रिय सदस्य देखील आहे.
हेही वाचा - देशातील कोरोना रुग्णांची संख्या ५१ लाखांवर; एकूण चाचण्यांनी ओलांडला सहा कोटींचा टप्पा...
कुख्यात गुंड इप्पा उर्फ इरफान खानची नागपुरातील तहसील पोलीस स्टेशन, लकडगंज आणि मोमीनपूरा भागात मोठ्या प्रमाणात दहशत आहे. त्याच्यावर मकोको देखील लावण्यात आला होता. खून, खुनाचा प्रयत्न, लुटपाट यासह अनेक गुन्ह्यांची नोंद त्याच्या विरुद्ध अनेक पोलीस ठाण्यात आहेत. एवढंच नाही तर आर्म्स अॅक्ट अंतर्गत सुद्धा त्याच्यावर गुन्हा नोंद आहे. तीन वर्षापूर्वी घडलेल्या एका खून प्रकरणात इप्पा टोळीच्या काही सदस्यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, इच्छू पोलिसांना वेळोवेळी चकमा देत पळून जाण्यास यशस्वी झाला होता.
पोलिसांना सूत्रांनी माहिती दिली की, इच्छू हा त्याच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घरात लपून बसलेला आहे. मात्र, त्या परिसरात त्याचे अनेक घर अगदी शेजारी-शेजारी लागून असल्यामुळे तो नेमका कुठे आहे याचा खुलासा होत नव्हता. अखेर पोलिसांनी योजनाबद्ध पद्धतीने इच्छूच्या घराच्या परिसरात आपले कर्मचारी वेषांतर करून तैनात केले होते. त्यानंतर पोलिसांनी तो कोणत्या घरात आहे या संदर्भात खात्री पटली. तेव्हा पोलिसांनी रात्री उशिरा धाड टाकून आरोपीला अटक केली आहे.