नागपूर - नागपूरच्या सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यात गतीमंद पीडित तरुणीवर दोन वर्षांपूर्वी मनमाड येथे बलात्कार झाला असल्याची बाब समोर आली आहे. यासोबतच पीडितेची आरोग्य तपासणी करत असताना तिच्या हातात आठ टाचण्यासुद्धा आढळल्या आहेत. तसेच, ज्या रूममध्ये त्या पीडित तरुणीवर अत्याचार झाला ती रुम उपलब्ध करून देणारा सातवा आरोपी असल्याचा खुलासा तपासात झाला आहे. याप्रकरणात आतापर्यंत सीताबर्डी पोलिसांनी चौघांना अटक केली असून इतर तीन जणांचा शोध सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त तृप्ती जाधव यांनी दिली आहे.
सहकाऱ्याने फोनवरून दिली रूम उपलब्ध करून -
या प्रकरणातील पीडित तरुणीवर गुरूवारी (29 जुलै) रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. त्यानंतर चार संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. यामध्ये दिवसभर चाललेल्या तपासानंतर पहिल्या बलात्काराच्या घटनेत मोमिनपुरा टिमकी परिसरातील रूममध्ये चौघांनी त्या पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. पण ही रूम मिळवण्यासाठी ऑटोचालक मो. शहानवाज उर्फ सांना वल्द मो. रशीद याने एकाला फोन लावला. त्याच व्यक्तीने रूम उपलब्ध करून दिली. यासह काही साहित्य आणि दारू उपलब्ध करून देत सहकार्य केल्याने आरोपीच्या संख्येत वाढ झाली. याप्रकरणात बलात्कार करणारे सहा जण आणि सहकारी असे सात जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात चौघांना अटक केली असून तिन्ही फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त तृप्ती जाधव यांनी दिली.
हेही वाचा - संतापजनक! नागपुरात एकाच रात्रीत अल्पवयीन गतिमंद मुलीवर दोनवेळा बलात्कार
आणि हातात आढळल्या आठ टाचण्या -
पीडित तरुणीची पोलीस विभागामार्फत शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यावेळी डॉक्टरांना पीडित तरुणीच्या हातावर सूज दिसून आली. त्याचा एक्सरे काढून तपासणी केली असता तिच्या हातात 8 टाचण्या असल्याचे पाहून डॉक्टरही चक्रावले. या टाचण्यामुळे संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्यामध्ये या आठ टाचण्या काढण्यात आल्या आहेत. सध्या ती तरुणी रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीत आहे. पण या टाचण्या नेमक्या केव्हा आणि का टोचल्या हे स्पष्ट झाले नाही. पण याचाही शोध पोलीस विभाग घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मनमाडमध्येही झाला होता बलात्कार -
रविवारी सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्याने नागपुरात खळबळ उडाली. पण पोलीस तपासात त्या पीडित तरुणीवर 2019 मध्ये मनमाडसुद्धा बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. त्यावेळीही अश्याच पद्धतीने ती पीडित तरुणी मनमाडला निघून गेली होती. त्यावेळी कुटुंबीयांनी इमामवाडा पोलिसात तक्रार दिली होती. त्यावेळी ती मिळून आली असताना तिच्यावर मनमाड येथे अत्याचार झाला असून तो अत्याचार सुद्धा एका ऑटोचालकाने केला होता. त्यावेळीसुद्धा ती कुटुंबियांशी पटत नसून भांडण करत मनमाडला निघून गेली होती. त्यानंतर जवळपास एक वर्षपेक्षा जास्त काळ शेल्टर होमला राहिली. पण कोरोनामुळे तिला घरी परतावे लागले होते. यावेळी देखील घरी वहिनीसोबत भांडण झाले म्हणून ती घर सोडून नाशिकला जाण्यासाठी निघाली होती. मात्र पैसे नसल्याने मदत करतो म्हणून ऑटो चालकाने फायदा घेत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणात सहाय्यक पोलीस आयुक्त तृप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांच्या नेतृत्वात पथकातील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी फरार आरोपीचा शोध घेत आहेत.