नागपूर - मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यातून महाराष्ट्रातील अनेक शहरात फक्त धनाढ्य कुटुंबांच्या लग्नातच चोऱ्या करणारी एक टोळी नागपूर पोलिसांनी पकडली आहे. मोठ्या घरातल्या लग्नात त्यांच्यापैकी एक वाटण्यासाठी या टोळीने सूटाबूटामध्ये चोरी करण्याचा नवा पायंडा पाडला. नवरीच्या जवळच्या नातेवाईकांच्या मागे सावलीसारखे फिरणे आणि क्षणात लाखो रुपयांचे दागिने किंवा इतर ऐवज लंपास करून ही टोळी शहर सोडत असे.
हेही वाचा... निर्भया प्रकरण : अखेर वेळ ठरली... दोषींना 3 मार्चला फाशी
नागपुरात गेल्या आठवड्यात रामदासपेठ परिसरातील एका हॉटेलमध्ये लग्न सोहळा होता. त्या लग्नात ही टोळी शिरली. टोळीतील लहान मुलाने स्टेजवर एका खुर्चीवर पिशवीमध्ये ठेवलेले लाखो रुपयांचे दागिने लंपास केले आणि लग्न सोहळा सोडला. त्याच्या पाठोपाठ इतर सदस्य बाहेर पडले. जोपर्यंत लग्नातील कुटुंबियांना चोरीची माहिती मिळाली, तोपर्यंत ही टोळी दुरपर्यंत पोहोचली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही टोळी मध्यप्रदेशातील त्यांच्या सांसी गावातून नागपूरसारख्या शहरात राहत होती. त्यानंतर तिथे राहून मोठ्या श्रीमंत घरातील लग्नाची माहिती घेत असे. लग्नात शिरून चोरी करणे आणि तिथून लगेच साडेआठशे किलोमीटर लांब असलेल्या आपल्या गावात परतणे असे त्यांचे नियोजन असायचे.
हेही वाचा... मेरी जान 'तिरंगा' है! राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी 'त्याने' लावली जीवाची बाजी
त्यांच्या सांसी या गावी जाऊन त्यांना पकडणे हे पोलिसांसाठी मोठे कठीण काम होते. कारण तिथले शेकडो लोक संघटितपणे पोलिसांवर हल्ला करायचे. पोलिसांनी आतापर्यंत या टोळीकडून ५ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने फक्त नागपुरात अशा प्रकारच्या ७ चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.