नागपूर - पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांगलादेश परिसराच्या मराठा चौक येथे क्षुल्लक कारणावरून पाच आरोपींनी संगनमत करून रूपेश कुंभारे या तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. मृतक रूपेश हा वेगाने दुचाकी चालवतो या छोट्याश्या कारणावरून आरोपींनी त्याच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली, त्याच वेळी प्रवीण वाघमारे आणि गौरव गिरडे या दोन आरोपींनी त्यांच्या जवळ असलेल्या चाकूने रूपेशवर वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर सर्व आरोपी पळून गेले असल्याने पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. धक्कादायक म्हणजे दोन दिवसांपूर्वी सुद्धा पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन विधिसंघर्ष आरोपींनी कुख्यात गुंडाचा खून केला होता. या प्रकरणातील पाच पैकी तीन आरोपी हे विधिसंघर्ष बालक आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रूपेश कुंभारे हा २२ वर्षीय तरुण मराठा चौकात राहतो. तो एका सलूनमध्ये कामाला होता. घरी येताना जाताना त्याच्या गाडीचा वेग जास्त असायचा म्हणून आरोपी प्रवीण वाघमारे आणि गौरव गिरडे यांनी त्याला हटकले होते. त्यावरून त्यांच्यात वाद देखील झाला होता. काल (मंगळवार) रात्री देखील याच विषयावरून त्यांच्यात भांडण झाले होते. रात्री उशिरा रूपेश हा मराठा चौकात फिरायला गेला असता पाच आरोपींनी मिळून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी प्रवीण आणि गौरव यांनी त्याच्यावर चाकूने वार करून पळ काढला. घटनेची माहिती समजताच पाचपावली पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
दहा दिवसात पाचपावली तीन खून
गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रक्तरंजित घटना वाढल्या आहेत. केवळ दहा दिवसांच्या अंतरात तिघांचा खून झाल्याची घटना घडली आहे. महत्वाचे म्हणजे दोन घटनेतील आरोपी हे विधिसंघर्ष बालक आहेत. पहिली घटना ही १९ एप्रिल रोजी घडली होती. दोन आरोपींनी मिळून लेडी डॉन म्हणून ओळख निर्माण करत असलेल्या पिंकी वर्मा या तरुणीचा खून झाला. तर दुसरी घटना ही २६ तारखेला घडली. दोन विधिसंघर्ष बालकांनी संगनमत करून इंद्रजित बेलपारधी नामक गुंडाचा काटा काढला. त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात १८ पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद होती. तर आरोपी विधिसंघर्ष बालकांवर देखील २०१९ मध्ये एकाचा खून केल्याचा गुन्हा दाखल आहे. तिसरी घटना २९ एप्रिल रोजी घडली आहे. यामध्ये पाच आरोपींनी संगनमत करून रूपेश नावाच्या तरुणाचा खून केला आहे.