नागपूर - भंडारा रुग्णालयात दुर्दैवी घटना होऊन पाच दिवस लोटले आहेत. मात्र, एकही गुन्हा दाखल झाला नाही. प्रमोद खंडाते यांना तात्काळ निलंबित करा. मग चौकशी करा, अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली. ते माध्यमांशी नागपुरात प्रेस क्लबमध्ये बोलत होते.
भंडारा रुग्णालयातील पीडित कुटुंबीयांची मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गुरुवारी भेट घेतली. त्यानंतर नागपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी किमान 25 लाख रुपये सरकारने पीडित कुटुंबीयांना द्यावे, अशी मागणी केली. माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणाऱ्यांनी हे कुटुंब आपले समजून न्याय द्यावा, असा टोला यावेळी मनसे नेते नांदगावकर यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.
हेही वाचा-भंडारा : रुग्णालयातील आगीत १० बालकांचा मृत्यू; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले चौकशीचे आदेश
पुढे ते म्हणाले की, या प्रकरणात तीन वर्षे झाले आहेत. रुग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन होऊनही फायर ऑडिट झाले नाही. असे दुर्लक्ष का झाले ? कोणाला पाठfशी घालण्याचे कारण नाही. चौकशीच्या फार्समध्ये काहीच होत नाही. तुटपुंजी मदत देऊनही होणार नाही. मृताच्या घरातील एकाला नोकरी द्या. इतके प्रकल्प असताना सरकार 10 लोकांना काम देऊ शकत नाही का, त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
संबंधित बातमी वाचा-नागरिकांचे जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग का येते बाळा नांदगावकर यांचा शासनाला सवाल
दरम्यान, डॉ. प्रमोद खंडाते हे भंडाऱ्यामधील सरकारी रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत.
धनंजय मुंडे प्रकरणात बोलता मर्यादा आहेत!
सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत. त्यावर बोलताना मनसे नेते नांदगावकर म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी स्वतः चौकशी करण्याची मागणी केली आहे. मग चौकशी होऊ द्या. तसेही प्रकरण कोर्टात आहे. सत्य काय ते पुढे येऊ द्या. यात आपण काही बोलण्यापेक्षा त्याला मर्यादा आहेत.
मनसे नेत्याच्या आरोपाची कल्पना नाही-
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने फसवल्याचे मनसेचे नेते मनीष धुरी यांनी म्हटले आहे. त्यावर बोलताना बाळा नांदगावकर यांनी खरे काय आणि खोटे काय आहे, हे माहित नसल्याचे म्हटले आहे. मनीष धुरी यांना विचारून माहिती घेईल, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज ठाकरे स्वतः बोलतील....
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे प्रमुख राज ठाकरे साहेब स्वत: बोलणार आहेत. शेतकरी रस्त्यावर उतरणे म्हणजे त्यांना अडचणी आहेत. त्या ऐकून घेऊन सुधारणा केल्या पाहिजेत. त्यांना दिलासा देणारा लोकांच्या हिताचा कायदा असला पाहिजे.
काय आहे घटना-
शनिवारी रात्री अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले. कामावर असलेल्या नर्सने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर दिसून आला. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. आगीवर तातडीने नियंत्रण मिळवले गेले. मात्र तरीही धुर मोठ्या प्रमाणात होता. या विभागामध्ये आऊट बोर्न आणि इन बोर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी इन बोर्नमधील असलेले सात बालके सुखरूप आहेत. तर आऊट बोर्न युनिटमधील 10 बालंकांचा मृत्यू झाला. भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.