नागपूर - राज्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात जीवितहाणी आणि वित्तहानी झाली आहे. दरडी कोसळून आणि इतर घटनामध्ये राज्यात सुमारे 200 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र या आकेडवारीत देखली राज्य सरकारकडे सुसूत्रता नसल्याचे दिसून येत आहे. याबाबतीत मंत्री आणि मंत्रालयीन विभागात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे.
एकीकडे राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी नागपुरात बोलताना राज्यात एकूण 169 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तेच दुसरीकडे मंत्रालयीन नियंत्रण कक्षाच्या विभागाकडून देण्यात आलेल्या अहवालात 213 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे नेमका कोणाच्या आकडेवारीवर विश्वास ठेवायचा? असा प्रश्न उद्भवत आहे. तसेच मग मंत्र्यांना चुकीची माहिती देणारे विभाग नेमके कोणते? असा प्रश्न देखील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
मृत्यूच्या आकडेवारीत तफावत-
राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार गुरुवारी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, त्यानंतर त्यांनी नागपुरात प्रसारमाधम्यांशी संवाद साधत राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात शुक्रवारपासून तत्काळ मदत वाटप करू अशी माहिती दिली. ही माहिती देत असताना त्यांनी राज्यातील या नैसर्गिक आपत्तीमधील एकूण बळींची संख्याही 169 असल्याचे सांगितले. तेच मंत्रालयीन कक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालामध्ये 213 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितलेली आणि मंत्रालयीन कक्षाकडून आलेल्या अहवालाच्या आकडेवारीत 44 मृत्यूची तफावत पुढे येत आहे.
मंत्रालयीन अहवालात रायगड -55, रत्नागिरी- 35, सिंधुदुर्ग -4, मुंबई -4, ठाणे - 15, कोल्हापूर -7, सातारा 46, पुणे-3, वर्धा -2, अकोला -2 या महापुरात या जिल्ह्यातील एकूण 213 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मंत्रालय आणि मंत्री यांच्यात समनव्य नसल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच यात अजून पंचनामे बाकी असून यात उद्यापासून 10 हजाराची मदत वाटपाला सुरुवात होईल असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. मंत्रालयीन अहवालात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी दोन कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत हा निधी वाटप होणार असल्याचेही या अहवालात सांगण्यात आले आहे.