नागपूर - संचारबंदीत राजस्थानातील कोटा येथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी येत्या दोन दिवसात कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांची यादी प्राप्त झाल्याची महिती राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी मध्यप्रदेश सरकारने राजस्थान येथे शिक्षणासाठी असलेल्या विद्यार्थ्यांना परत आणले होते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
राज्यातील सुमारे १८०० विद्यार्थी राजस्थानच्या कोटा येथे अडकून पडलेले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना परत आणण्याची मागणी केली आहे. त्यानुसार राज्य सरकारने केंद्र सरकारकडे विद्यार्थ्यांना परत आणण्याची परवानगी मागितली आहे. शिवाय राजस्थान सरकारला देखील या संदर्भात पत्र लिहिल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.