नागपूर - राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक राजकारणात एकमेकांवर टीका करत निशाणा साधत आहेत. तेच नागपूरला मात्र सत्ताधारी पक्षाचे नेते ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कशी मैत्री आहे, याबाबत खुलासा केला आहे. अजित पवार यांच्या अर्थ खात्याची फिरकी घ्यायची झाली, तर आपण विरोधी पक्षनेत्यांना चिठ्ठी पाठवून देत असल्याचे त्यांनी मिश्किलपणे सांगितले. त्यानंतर त्यावर कार्यवाही होते, असेही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचे ना मनभेद आहेत, ना मतभेद आहेत, असेही नितीन राऊतांनी स्पष्ट केले. त्यामुळे राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू किवा मित्र नसतो, हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची फटकेबाजी - बाबरी मशीद पाडताना मी स्वतः उपस्थित होतो, असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे त्यांच्या वयाबद्दल जोरदार सध्या चर्चा सुरू आहे. त्याला प्रत्युत्तर देताना नागपूरमधील आयोजित एका खासगी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच टोला लगावला आहे. राज्यातील एक मराठी वृत्तपत्र हे माझ्यापेक्षा (51) एक वर्षाने लहान आहे. सांगण्याचे कारण म्हणजे बाबरी मशीद 1992 मध्ये पडताना मी किती वर्षांचा होतो, यावर देखील वाद सुरू आहे. मी रामजन्मभूमीच्या आंदोलनात होतो, असे म्हणालो, त्यावेळी मी तेरा वर्षांचा होतो, अशी कुणीतरी टीका केली. पण त्यावेळी मी 22 वर्षांचा होतो आणि नगरसेवक होतो असा टोला देवेंद्र फडणीस यांनी लगावत जोरदार प्रतिउत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस यांच्याशी ना मनभेद ना मतभेद - याच कार्यक्रमात नागपूरचे पालकमंत्री तथा काँग्रेसचे नेते ऊर्जामंत्री नितीन राऊत हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांनी, देवेंद्र फडणवीस आणि मी जरी वेगवेगळ्या पक्षात असलो, तरी अनेकदा एकत्र येऊन चांगल्या कामाला पाठिंबा दिला आहे. यात समृद्धी मार्ग असो की कोरोनाच्या काळात नागपुरात आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याचे प्रयत्न असो, असेही नितीन राऊत म्हणाले.
सभागृहात काही बाबी माझ्या पक्षाला आवडणार नसतील, तर मी हळूच देवेन्द्र फडणवीस यांना चिठ्ठी पाठवत असतो, अशी मिश्कील कबुली त्यांनी दिली. सत्ता पक्षात असताना अर्थ खात्याची गम्मत करायची असल्यास मी हळुच त्यांना चिठ्ठी पाठवून सभागृहात मांडायला लावतो, असेही ऊर्जामंत्री नितीन राऊत मिश्कीलपणे म्हणाले.