नागपूर - कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाला देशभरातील विविध राज्यांतून समर्थन मिळत आहे. अशा वेळी, रावसाहेब दानवे यांचे ते वक्तव्य म्हणजे आंदोलक शेतकऱ्यांचा घोर अपमान करणारे आहे, अशी टीका करत दानवेंचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समाचार घेतला. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला सर्व स्तरांतून समर्थन देण्यात येत आहे. अशावेळी एका दिग्गज नेत्याने असे विधान करणे चुकीचे आहे,' असे या वेळी गृहमंत्री देशमुख म्हणाले.
हेही वाचा - माझ्या उत्तराने अधिकाऱ्यांचे समाधान झाले की नाही, हे माहीत नाही- प्रताप सरनाईक
'शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन-पाकिस्तानचा हात आहे, असे वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी नुकतेच केले होते. या वक्तव्याचा विविध राजकीय नेत्यांकडून समाचार घेतला जात आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनीही दानवेंच्या या विधानावर नाराजी व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'गेल्या १३-१४ दिवसापासून 'कृषी कायदे रद्द करा' या मागणीसाठी देशभरात आंदोलने सुरू आहेत. केंद्र शासनाने या आंदोलनाची दखल अद्यापही न घेतल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी शेतकरी आंदोलनाला राज्यभरातून विविध संघटना, पक्षांचा पाठिंबा मिळतो आहे. अशातच एका मोठ्या पक्षाच्या, केंद्रात मंत्री राहिलेल्या रावसाहेब दानवे यांचे शेतकऱ्यांबद्दलचे ते वक्तव्य घोर अपमान करणारे आहे', अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी दानवेंचा समाचार घेतला.
शक्ती कायद्यावरही थोडक्यात स्पष्टीकरण
या पत्रकार परिषदेत नुकतेच मंत्री मंडळाच्या बैठकीत संमती देण्यात आलेल्या 'शक्ती' कायद्यातील बाबींवरही गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. 'शक्ती कायदा' महिला हिताचा असून येत्या अधिवेशनात यावर चर्चा करून हा याचा कायदा करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे गृहमंत्री म्हणाले. तसेच, या कायद्यामुळे महाराष्ट्रात महिलांना कोणतीही भीती राहणार नाही, असेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.
हेही वाचा - 1981 पासून कांजूरची जागा आमचीच, राज्य सरकारचे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण; उद्याच्या सुनावणीकडे लक्ष