नागपूर - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून संपूर्ण देशभरात विरोध प्रदर्शन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व नागपूरच्या टिळक पुतळा चौकात लाक्षणिक निदर्शन करण्यात आले. ही निदर्शने केवळ पाच नेत्यांच्या उपस्थित प्रदर्शन करण्यात आली, असून सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले. मात्र, आपल्या नेत्याला प्रदर्शन करताना बघून अनेकांची गर्दी गोळा झाली होती.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने प्रचंड मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर अचानक पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले सुरू झालेले आहेत. आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना भारतीय जनता पार्टीकडून देशभरात निदर्शने करण्यात आली. नागपूर शहरात सुमारे ३०० ठिकाणी प्रतिकात्मक निदर्शने करण्यात आली.
'पश्चिम बंगाल हिंसाचारावर विचारवंत पत्रकार गप्प काय?' -
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा कार्यकर्त्यांवर राज्य सरकारच्या पाठिंब्यामुळे मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. या घटनांमुळे लोकशाही वर संकट निर्माण झाले आहे. मात्र, या बाबत विचारवंत पत्रकार मूग गिळून गप्प का आहेत, अशी विचारणा फडणवीस यांनी केली. या पश्चिम बंगाल हिंसाचाराच्या निषेधार्थ नागपूरला झालेल्या निदर्शनात सहभागी झाले असताना फडणवीस बोलत होते. पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे संपूर्ण देशभरातील भाजपा कार्यकर्ते असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.