नागपूर - मनोज ठवकर मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे, एवढंच नाही तर या प्रकरणाशी संबंधित एक पोलीस निरीक्षक आणि तीन कर्मचाऱ्यांची बदली पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली असल्याची माहिती नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
बुधवारी रात्री नागपूर शहरातील पारडी परिसरात पोलिसांनी लावलेल्या नाकेबंदी दरम्यान मनोज ठवकर नामक व्यक्तीच्या गाडीची धडक पोलिसांच्या वाहनाला लागली, ज्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी मनोजला मारहाण केली, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता, असा आरोप नागरिकांनी केला होता.
मनोज ठवकर मृत्यू प्रकरणाचा तपास पारदर्शक व्हावा आणि या प्रकरणात नागपूर पोलीस दलातील कर्मचारी जबाबदार असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, या उद्देशाने या घटनेचा तपास सीआयडीकडे सोपवला असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. डॉक्टरांनी ज्यावेळी मनोज यांना तपासले तेव्हा त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा दिसून आलेल्या नाहीत, मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच यावर स्पष्टपणे बोलता येईल, असं देखील पोलीस आयुक्त म्हणाले आहेत.
- काय आहे प्रकरण?
बुधवारी रात्री मनोज काही कामानिमित्त बाजारात गेले होते. तेथून घरी परत येत असताना पारडी परिसरात पोलिसांची नाकाबंदी कारवाई सुरू होती. यामध्ये ड्रिंक अँड ड्राइव्हसह मास्क न घातलेल्या वाहनचालकांना दंड केला जात होता. त्याचवेळी मनोज देखील तिथून जात असताना पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, मनोजने साफ दुर्लक्ष केले आणि गाडी पळवण्याचा प्रयत्न केला. वाहनचालक पळून जात असल्याने पोलीस देखील त्याला आडवे झाले, तेव्हा मनोजच्या दुचाकीची धडक पोलिसांच्या वाहनाला लागली, ज्यामुळे चिडलेल्या पोलिसांनी त्याला त्याच ठिकाणी मारहाण करायला सुरुवात केली, असा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यानंतर पोलिसांनी मनोजला पारडी पोलीस ठाण्यात नेऊन पुन्हा मारहाण केली, ज्यामध्ये मनोज निपचित पडला, असेही सांगितले जात आहे. पोलिसांनी लगेचच त्याला जवळील भवानी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मनोजला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती कळताच पारडी परिसरात शेकडो नागरिक गोळा झाले होते. नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळल्याने पारडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी अतिशय संयमाने प्रकरण हाताळून या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन लोकांचा राग शांत केला होता.
- पोलीस थर्ड डिग्री किंवा कस्टोडियल वायलन्सचे समर्थन करत नाही:- पोलीस आयुक्त
मनोज ठवकर यांचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस सदैव रस्त्यावर उतरून कार्य करत असतात. अनेकवेळा संतापजनक घटना घडतात. मात्र, पोलीस थर्ड डिग्री किंवा कस्टोडियल वायलन्सचे समर्थन करत नसल्याचे पोलीस आयुक्त यांनी सांगितले.