नागपूर - सध्या नागपूर शहरात गाजत असलेल्या हनीट्रॅप प्रकरणातील मुख्य आरोपी साहिल सय्यद याला नागपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. तो त्याच्या मानकापूर परिसरातील राहत्या घरी असल्याची माहिती समजताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दया शंकर तिवारी यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप साहिल सय्यदवर आहे. याशिवाय फसवणूक, संपत्ती बळकवण्याच्या प्रकरणात तो पोलिसांना हवा होता. तो घरी असल्याची माहिती समजताच गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
साहिल सय्यद आणि त्याच्या सहकाऱ्यांवर आरोप आहे की, ४ जुलै रोजी त्यांनी एलेक्सिस रुग्णालयात जाऊन डॉक्टर्सला दमदाटी केली होती. त्यानंतर त्याने डॉक्टर्सला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा रुग्णालयाचा आरोप आहे. रुग्णालयाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करत या प्रकरणी सय्यद आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, साहिल सय्यद कोणत्या पक्षाचा कार्यकर्ते आहे यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती.
त्यासंदर्भांत फडणवीस यांनी साहिल सय्यदचे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतचे काही फोटो व्हायरल केले होते. त्यानंतर साहिल सय्यद हा भाजप नेत्यांचा निकटवर्तीय असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते, त्या करिता त्यांनी सुद्धा काही दाखले देत भाजप नेत्यांसोबत साहिल सय्यदचे फोटो प्रसिद्ध केले होते. दोन्ही नेत्यांच्या आरोप प्रत्यारोमुळे साहिल सय्यदला अटक होण्याची शक्यता वाढली होती.