नागपूर - गणेशोत्सवानिमित्ताने नागपूर येथील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत. गणेशोत्सवानिमित्ताने टेकडी गणेश मंदिरात विशेष तयारी करण्यात आली आहे. नागपूरचं नव्हे तर विदर्भ आणि मध्य भारतातील नागरिकांच्या आस्थेचं श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणेश मंदिरात भाविकांची मांदियाळी आपल्याला वर्षभर बघायला मिळते. नवसाला पावणारा बाप्पा म्हणून देखील टेकडी गणेश प्रसिद्ध आहे. मात्र, यावर्षीसुद्धा कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे मंदिराचे द्वार भक्तांसाठी बंद करण्यात आले आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे जवळून दर्शन घेता येत नसल्याची सल प्रत्येक गणेश भक्तांच्या मनात आहे.
हेही वाचा - Ganeshotsav 2021 : जाणून घ्या, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास
- टेकडी गणपती मंदिराचा इतिहास:-
आपल्या देशात इंग्रजांची सत्ता होती. तेव्हा राजे भोसले आणि इंग्रजांची लढाई सीताबर्डी परिसरातील टेकडीवर झाली होती, असा इतिहास आहे. त्याच टेकडीवर गणेश मंदिर आहे. त्या काळी शुक्रवारी तलावाचे पाणी टेकडी मंदिरापर्यंत येत असल्याने भोसले राजे नावेतून गणेश मंदिरात दर्शनासाठी येत असल्याची माहिती आहे. गणपती बाप्पाची मूर्ती पिंपळाच्या झाडाखाली स्थानापन्न आहे. सुरुवातीच्या काळात हे विनायकाचं मंदिर अगदी छोटासं होतं. त्यानंतर हळूहळू टेकडी गणेश मंदिराचा विकास झाला. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे, मात्र बाप्पाची मूर्ती उत्तराभिमुख आहे, तर मूर्ती उजव्या सोंडेची आहे. गणपती मूर्तीच्या मागच्या भिंतीजवळ एक शिवलिंग आहे. बापाच्या मूर्तीची उंची साडेचार फूट तर रुंदी तीन फूट आहे. मूर्तीला दोन पाय, चार हात, डोकं आणि सोंड असून शेंदराच्या लेपामुळे आता ते स्पष्टपणे दिसत नाही.
- सर्व सुरू झालंय, मग मंदिर कधी सुरू करणार -
कोरोनाची दुसरी लाट संपलेली आहे. आता तिसऱ्या लाटे संदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र, या दरम्यानच्या काळात सर्व प्रकारचे निर्बंध शिथिल करण्यात आले असताना केवळ मंदिर बंद ठेवण्यामागे काय कारण आहे? असा प्रश्न भक्तांसह मंदिर व्यवस्थापकीय सदस्यांनी देखील उपस्थित केला आहे. उत्सवाचा काळ सुरू झाला आहे, यादरम्यान भक्तांना मंदिरात जाऊन आपल्या देवांचे दर्शन घेता यावं यासाठी प्रशासनाने नियमावली तयार करावी, त्याचं तंतोतंत पालन व्यवस्थापकीय मंडळाकडून केलं जाईल, असं मत दिलीप मनोहरराव शहाकार यांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा - Ganeshotsav 2021 : जाणून घ्या, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचा इतिहास