नागपूर - मागील महिन्यात तब्बल १९ खुनाच्या घटना घडल्यानंतर नागपूर शहरातील गुंडांमध्ये कायद्याची भीती शिल्लक आहे की नाही असा प्रश्न नागरिकांना पडला होता. या महिन्यात खूनी घटनांची संख्या कमी झालेली असली तरी गुंडाकडून दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्न जराही कमी झालेला नाही. अशीच एक घटना बुधवारी रात्री शहरातील शांतीनगर आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
सुमारे १५ ते २० तरुण हातात तलवारी आणि शस्त्र घेऊन शुभम पंढरी खापेकर नामक तरुणाला मारण्याची शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे. पंढरी खापेकर यांच्या तक्रारीवरून तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी १३ तरुणांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींजवळून काही शस्त्र देखील जप्त केले आहेत.
आरोपी सीसीटीव्हीत कैद
नागपूर शहरातील गुन्हेगार पोलिसांना जुमानत नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. शांती नगर परिसरातील हे तरुण हातात लाठ्या काठ्या, तलवारी आणि शस्त्र घेऊन पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या शुभम नावाच्या तरुणाला मारहाण करण्यासाठी जात होते. त्याआधी आरोपींनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. हे आरोपी शांतीनगर परिसरातील दहीबाजार, भीम चौक परिसरात दुचाकीवरून धुमाकूळ घालत होते. त्याचवेळी आरोपींना पोलीस उभे असल्याचे दिसताच आरोपींनी पळ काढला. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात १३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.