नागपूर - विकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी नागपुरात अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. यात मोजकेच अत्यावश्यक सेवत असणारे लोक बाहेर पडताना दिसून येत आहेत. नागपूरकरांनी घरातच राहून विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिल्याने, रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.
दरम्यान नागपूरमध्ये नेहमी वर्दळ असलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. नागपुरात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. नागपूरमध्ये जवळपास 51 हजारांच्या घरात सक्रिय रुग्ण आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून सातत्याने दररोज 5 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना घरीच राहाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागपूरकरांनी देखील प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरीच राहाणे पंसत केले आहे.
नागपूरमध्ये कोरोना परिस्थिती गंभीर
नागपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे आता रुग्णांसाठी बेड देखील कमी पडत आहेत. अनेक रुग्णांवर घरीच राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोउपचार सुरू आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनासाठी रुग्णांच्या नातेवाईकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.
हेही वाचा - 'कोरोना लस घ्या आणि जेवणावर ३० टक्के सूट मिळावा'! कोल्हापुरातील हॉटेल चालकाची अनोखी ऑफर