नागपूर - केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत 'अग्निपथ' नावाने नुकतीच एक महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. मात्र, ही योजना जाहीर होताचं देशाच्या अनेक राज्यात हिंसक प्रदर्शन सुरू झाले ( Agnipath Scheme Protest ) आहे. मुळात ही योजना ऐच्छिक आहे, त्यामुळे जाणीवपूर्वक वाद-विवाद घडवून आणला जात असल्याचा आरोप केंद्र सरकारचे मंत्री आणि माजी सैन्य प्रमुख जनरल व्ही के सिंग यांनी केला ( General VK Singh On Agnipath Scheme ) आहे. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारीचा मोठा प्रश्न मार्गी लागले, असं सांगत त्यांनी सरकारची बाजू मांडली आहे. ते नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जनरल व्ही के सिंग म्हणाले की, अग्निपथ योजनेच्या माध्यमातून देशातील तरुणांना 4 वर्षांसाठी अग्निविर होण्याचा संधी प्राप्त होणार आहे. तर, 25 टक्के सर्वोत्कृष्ट सैनिकांना उर्वरित भविष्य सैन्यात घडवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विरोधकांकडे आता कुठलाही मुद्दा शिल्लक राहिला नसल्याने ईडी आणि 'अग्निपथ' या दोन विषयांवर लोकांना भडकवण्याचे काम केलं जातं आहे, असा आरोपही सिंग यांनी केला आहे.
'अग्निपथ' या योजनाची सरकारने केवळ घोषणाचं केली आहे. ती सुरू झालेली नाही, त्यामुळे यावर विवाद करणे योग्य नाही. सैन्य कधीही रोजगाराचे माध्यम नव्हते, देश सेवेचा वसा आहे. सैन्यात काम करताना सर्व शर्थी आणि नियम कायदे मानावे लागतात. 'अग्निपथ'मध्ये सुद्धा तसेच नियम पाळावे लागतात, तेव्हा तुमची नियुक्ती होईल. त्यांनतर या चार वर्षात तुम्ही दिलेली सेवा उत्कृष्ट राहील तेव्हा 25 टक्के तरुणांची सैन्यात नियुक्ती होणार आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांनी तर जाहीर केलं आहे की चार वर्षाची सेवा पूर्ण करून आलेल्या तरुणांना राज्याच्या नोकरीमध्ये प्राधन्य दिले जाईल, असेही सिंग यांनी स्पष्ट केलं.
'इथेही प्रशिक्षणालाचं महत्त्व' - 'अग्निपथ' योजनेच्या संदर्भात अद्याप सर्व बाबी स्पष्ट झालेल्या नाहीत. अनेक जण केवळ सहा महिन्यांची ट्रेनिंगवर प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र, ज्या प्रमाणे सैन्यात ट्रेनिंग ही प्रक्रिया निरंतर सुरू राहते, त्याच प्रकारे 'अग्निपथ'मध्ये सुद्धा चार वर्षात प्रशिक्षणाची प्रक्रिया सुरु राहणार आहे. सैन्याची ट्रेनिंग पूर्ण केलेला तरुण वाईट मार्गावर जाणार नाही, असा दावा जनरल व्ही के सिंग यांनी केला आहे.
'चार वर्षांत मोठी रक्कम मिळणार' - सैन्यात चार वर्षे अग्निवीर म्हणून काम केल्यानंतर मोठी रक्कम उमेदवाराच्या हाती पडणार आहे. शिवाय 25 टक्के तरुणांना सैन्यात काम करण्याची संधी देखील उपलब्ध होणार असल्याने देशाच्या संरक्षण क्षेत्राला मजबुती मिळेल. एखादा तरुण 18 व्या वर्षी अग्निविर झाल्यास 22 वर्षी त्याच्या हाती सुमारे 20 ते 22 लाखांची मोठी रक्कम हाती पडेल. त्यातून तो स्वतःचा व्यवसाय देखील उभा करू शकतो. पण, तरुणांचे माथे भडकवण्याचे काम काही तत्वांकडून केले जात असल्याचा आरोप देखील जनरल व्ही के सिंग यांनी केला आहे.