नागपूर : नागपूर शहर पोलीस विभागातील गुन्हे शाखेच्या सायबर सेलच्या पथकाला मोठं यश मिळालं आहे. ऑनलाइन बँक व्हेरिफिकेशनच्या नावाखाली ग्राहकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना दिल्ली येथून सायबर सेलने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चार नायजेरियन आणि एका भारतीय व्यक्तीचा समावेश आहे. सुजित दिलीप तिवारी, मिशेल स्कॉटस कोलाई, इदु डॉलर उकेके, इमु संडे अझुडाईके आणि केल्वीन नेके अशी या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी सामान्य लोकांकडून त्यांनी लुटलेले १८ लाख रुपये त्याच्या बँक खात्यात जमा झाले होते, ही रक्कम सुद्धा गोठवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
भारतीय लष्करातील वैद्यकीय स्टाफ पदावरून निवृत्त झालेल्या महिलेला परदेशात चांगल्या पगाराची नोकरी लाऊन देण्याचा भूलथापा देऊन या टोळीने त्यांचा कडून तब्बल ४१ लाख ७० हजार रुपयांनी फसवणूक केली होती. आरोपींनी त्या महिलेला नोकरीचे आमिष दाखवल्यानंतर ती आपल्या जाळ्यात अडकल्याची खात्री पटल्यानंतर आरोपींनी टप्याटप्याने पैसे वसूल करायला सुरुवात केली होती. मात्र एका टप्यावर जेव्हा त्या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले, त्याच क्षणी तिने सायबर पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची तक्रार नोंदवली.
तक्रात दाखल होतात सायबर सेल तपासाच्या कामी लागले होते. हा तपास नागपूर वरून दिल्ली पर्यंत गेला. बँकेमार्फत पैशाचे व्यवहार झाले होते, त्याच मार्फत चौकशीची दिशा पोलिसांना मिळाली होती. सायबर सेल पोलिसांनी दिल्लीला जाऊन पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चार नायजेरियन आणि एका भारतीय इसमाचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींच्या खात्यातील १८ लाख रुपये गोठवले आहेत, जे त्यांनी ग्राहकांची फसवणूक करून गोळा केले होते. आरोपींची आठ बँक खाती असल्याचे देखील पुढे आले आहे, या खात्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेकांनी कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याचे देखील समोर आले आहे.