नागपूर - तीन तलाक कायद्यानंतरसुद्धा तिहेरी तलाक देण्याच्या घटना सुरूच आहेत. तलाक तलाक तलाक म्हणत पत्नीला घटस्फोट दिल्याची तक्रार नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यात आली आहे. पत्र पाठवून पत्नीला तिहेरी तलाक देणाऱ्या सूरतच्या व्यावसायिकाविरूद्ध तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोईन अब्दुल करीम नूरानी (३९) असे त्या तलाक देणाऱ्या आरोपीचे नाव असून तो सूरतचा रहिवासी आहे. शहरातील तिहेरी तलाकची ही दुसरी घटना असून, ऑक्टोबर २०१९ ला मानकापूर पोलिसांनी तिहेरी तलाकचा पहिला गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा - खाणीत मातीचा ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू, एका चिनी नागरिकाचा समावेश
मोईन सूरतला टेक्सटाईल कंपनीत काम करतो. 13 वर्षांपूर्वी मोईनचे लग्न नागपुरातील अबरीनशी झाले. लग्नानंतर काहीच दिवसात मोईनने तिला हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. अबरीनने हा त्रास सात वर्षे सहन केला पण, मोईनच्या असुरी वागण्यात वाढच झाली. मोईनच्या जाचाला कंटाळून अबरीनने पोलिसात तक्रार केली. पण, मोईनच्या वागण्यात बदल झाला नाही आणि तो हुंड्यासाठी सतत त्रास देऊ लागला. शेवटी हतबल झालेल्या अबरीनने माहेर गाठलं आणि ती आपल्या २ मुलींसह नागपुरात राहू लागली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अबरीनला मोईनचे एक पत्र आले. या पत्रामध्ये गुजराती भाषेत तीनवेळा तलाक असे लिहिले होते. याबाबत पीडितेने तहसील पोलिसात तक्रार देत न्याय मागितला आहे. आता समाजाची परवा न करता पीडित मुलगी न्यायासाठी संघर्ष करणार आहे. तीन तलाकचा कायदा आपल्या सारख्या मुलींना एक नवं जीवन देणार असल्याचे पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.