नागपूर - नागपूरच्या क्वेटा कॉलनी परिसरात भ्रूण मिळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली ( Embryo Found In Nagpur ) आहे. लकडगंज पोलीस स्टेशनअंतर्गत महानगर पालिकेच्या जुन्या झोन कार्यालयाच्या सुरक्षा भिंतीला लागून कचऱ्याचा ढिगाऱ्यात हे भ्रूण मिळून आले आहे. यात एकापेक्षा जास्त (चार ते पाच) भ्रूण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंचनामा करत भ्रूण ताब्यात
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. तसेच नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली आहे. स्थानिक नागरिकांना या ठिकाणी भ्रूण पडले असल्याची माहिती मिळाली. यानंतर लागलीच ही माहिती पोलिसांना दिली. यावेळी याठिकाणी पोलिसांनी वैद्यकीय तज्ञ आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ यांच्या माध्यमातून पंचनामा करत भ्रूण ताब्यात घेतले आहे.
मेडिकल वेस्ट टाकण्यात आले
प्राथमिक चौकशीमध्ये याठिकाणी मेडिकल वेस्ट टाकण्यात आले असून त्यातील हे भ्रूण असण्याची शक्यता आहे. याठिकाणी कचऱ्यात भ्रूण असल्याच्या माहितीला दुजोरा दिला असला तरी पोलिसांनी नेमके किती भ्रूण आहे हे मात्र स्पष्ट केले नाही. याठिकाणी तीन विकसित आणि इतर अविकसित भ्रूण, किडनी आणि हाडे मिळाल्याचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी सांगितले. वैदकीय अहवालानंतर हे स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे.
अवैधरित्या गर्भपात केलेले तर नाही ना?
यात हे भ्रूण बायोमेडिकल वेस्टमध्ये असल्याने अवैधरित्या गर्भपात केलेले तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. याबद्दल मात्र पोलीस उपायुक्त गाजमन राजमाने यांनी आताच अधिक न बोलता तपास करत असल्याचेही सांगितले. यात बायोमेडिकल वेस्ट हे नेमके कोणी फेकले याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. कारण कायद्यानुसार अशा पद्धतीने बायोमेडिकल वेस्ट फेकणे हा गुन्हा आहे. यातच याठिकाणी कचऱ्यात भ्रूण हे फेकणारा कोण आणि हे मेडिकल वेस्ट कोणत्या हॉस्पिटलचे आहे याचा शोध घेताना पोलीसांची दमछाक होणार आहे.