नागपूर - शहरात पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात स्थानिक नगरसेवक विविध तक्रारी करत आहेत. मात्र, आज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनात पालिका सभागृहाबाहेर युवासेना, युवक काँग्रेस व प्रहार संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले.
शनिवारी(२० जून) महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सभात्याग केला होता. त्यानंतर पालिकेची सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली होती. यानंतर आज पुन्हा ही सभा पार पडणार आहे. यावेळी महापालिकेतील सत्ताधारी भाजप व महापौरांविरुद्ध देखील घोषणाबाजी करण्यात आली.
शनिवारी तब्बल तीन महिन्यानंतर सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही नगरसेवक उच्च आवाजात बोलल्याने मुंढे यांनी सभात्याग केला. त्यामुळे चर्चा चांगलीच गाजली. मात्र, आता नागपुरात आयुक्तांच्या पवित्र्यावरून सत्ताधारी भाजपला कैचीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. मुंढे विरुद्ध सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्यानंतर युवक काँग्रेस आणि शिवसेना मुंढे यांच्या समर्थानात रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे.
आज युवक काँग्रेससोबत प्रहार संघटना आणि युवा सेना हे देखील मुंढे यांच्या समर्थनात आल्याने नागपुरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या सर्व घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे सभेसाठी सुरेश भट सभागृहात दाखल झाले आहेत.