नागपूर - एखादी गुन्हेगार घटना किंवा अपघात घडल्यानंतर प्रथम कर्तव्य म्हणून सर्वात आधी पोलिसांना सूचना दिली जातात. तरी ही देखील सर्वात उशिरा पोलीस घटनास्थळी पोहचतात अशी जनमानसात पोलिसांची नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठ आणि कर्तव्यदक्षपणावर लागलेला कामचुकारपणाचा शिक्का पुसण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्य पोलीस दलाकडून अतिशय प्रामाणिक प्रयत्न सुरू झाले आहेत. एखाद्या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस पथक किती वेळात घटनास्थळी पोहचतात, याची माहिती संकलित केली जाते आहे. जी माहिती समोर आली आहे. त्यानुसार मागील 6 महिन्यात नागपूर ग्रामीण पोलिसांचा रिस्पॉन्स टाईम राज्यात सर्वात कमी राहिला आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी डायल 112 हा क्रमांक सुरू करण्यात आला आहे. डायल 112 हा क्रमांक आता नागरिकांनी पाठ केल्यामुळे घटनेची माहिती तात्काळ समजते. त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी सरासरी 6 ते 9 मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल होतात असे आकडे समोर आले आहेत.
महाराष्ट्र पोलीस विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यातील सर्व पोलीस दलांच्या कामाचे मूल्यमापन केलं जात आहे. त्याचे एक भाग म्हणून पोलिसांचा रिस्पॉन्स टाईम तपासला जात आहे. जून महिन्यात तर नागपूर (ग्रामीण) पोलिसांचा रिस्पॉन्स टाईम सरासरी 6 मिनिटे 52 सेकंद इतका राहिला आहे. हा ऑल टाईम रेकॉर्ड आहे. बहुदा राज्यातचं नाही तर देशात सुद्धा इतक्या कमी वेळात पोलीस घटनास्थळी पोहचू शकले नसतील.
4 महिन्यातील रिस्पॉन्स टाईम(सरासरी) :- रिस्पॉन्स टाईम सुधारण्यासाठी नागपूर ( ग्रामीण ) पोलिसांनी डायल 112 अंतर्गत अनेक वाहन ऑन फिल्ड तैनात केले आहेत. त्यानुसार मागील चार महिन्यांत रिस्पॉन्स टाईमची आकडेवारी समोर आली आहे.
एप्रिल महिन्यात - नागपूर पोलिसांचा रिस्पॉन्स टाईम हा 9 मिनिटे राहिला आहे. एप्रिल महिन्यात डायल 112 वर एकूण 923 कॉल आले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद शहर पोलिसांचा नंबर लागतो. औरंगाबाद शहर पोलीस 9 मिनिटे 11 सेकंदात घटनास्थळी दाखल होऊ शकले होते. या यादीत नागपूर शहर पोलीस मात्र 22 व्या स्थानी आहेत. एप्रिल महिन्यात त्यांचा रिस्पॉन्स टाईम 16 मिनिटे 03 सेकंद होता. अर्थात इतर शहराच्या तुलनेत नागपूर शहर पोलिसांना येणाऱ्या कॉलची संख्या 8 ते 10 हजारांच्या घरात आहे.
मे महिन्यात - सुद्धा डायल 112 वर आलेल्या कॉलला रिस्पॉन्स देण्यात नागपूर ( ग्रामीण ) पोलीस अव्वल ठरली आहे. मे महिन्यात एकूण 1076 कॉल प्राप्त झाले असून पोलिसांचा रिस्पॉन्स टाईम हा 7 मिनिटे 58 सेकंद होता. नागपूर ग्रामीण पोलिसांच्या नंतर रायगड पोलिसांचा नंबर लागला होता. मे महिन्यात रायगड पोलिसांना एकूण 801 कॉल डायल 112 वर आले होते. त्यांचा रिस्पॉन्स टाईम हा 7 मिनिटे 58 सेकंद इतका होता. मे महिन्यात नागपूर शहर पोलिसांचा रिस्पॉन्स टाईम 17.21 इतका असून त्यांना 27 व्या स्थानी समाधान मानावे लागले होते.
जून महिन्यात - तर नागपूर ग्रामीण पोलिसांनी स्वतःचाच रेकॉर्ड मोडीत काढत केवळ 6.52 मिनिटांचा रिस्पॉन्स टाईम रेकॉर्ड केला आहे. या महिन्यात नागपूर ग्रामीण कंट्रोल रूमला एकूण 1036 कॉल प्राप्त झाले होते. जून महिन्यात दुसऱ्या क्रमांकावर वाशीम पोलीस आहेत. त्यांचा रिस्पॉन्स टाईम हा 8 मिनिटे 22 सेकंद इतका होता.
जुलै महिन्यात - नागपूर ग्रामीण पोलिसांना डायल 112 वरून 989 फोन आले होते. त्यावेळी रिस्पॉन्स टाईम हा 7 मिनिटे 26 सेकंद इतका रेकॉड करण्यात आला आहे.
बुडत्याला डायल 112 चा आधार - गेल्या महिन्यात नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद नदीच्या पुलावर दोन वाहन अडकले होते. ज्यात 10 लोक अडकून पडले होते. पुराचा वेडा वाढत असताना जीव धोक्यात आल्यानंतर पुरात अडकलेल्या नागरिकांनी डायल 112 वर कॉल करून मदत मागितली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये नागपूर ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि सर्वांना सुखरूप बाहेर काढून त्यांचे जीव वाचवले होते.
हेही वाचा - बँकेत नोकरी करीत आयुष्यभर दुसऱ्यांना हसवणाऱ्या प्रदीप पटवर्धनांची एक्झीट
हेही वाचा - Bihar changing power equation : भाजपपासून फारकत घेतल्यावरही बिहारमध्ये राहणार नितीश कुमार यांचेच सरकार ?